अबुधाबी IRE Beat SA in 2nd T20I : आयर्लंड क्रिकेट संघानं इतिहास रचला आहे. अबुधाबी इथं खेळल्या गेलेल्या दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात त्यांनी बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. आयर्लंडनं T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे. यासह दुसरी T20 मालिका 1-1 अशी बरोबरीत संपली. पहिला T20 सामना 8 गडी राखून जिंकणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा दुसऱ्या T20 सामन्यात आयर्लंडकडून 10 धावांनी पराभव झाला. या विजयात आयर्लंडकडून खेळणाऱ्या दोन भावांची भूमिका निर्णायक ठरली. रग्बी खेळून क्रिकेटमध्ये आलेल्या मोठ्या भावानं फलंदाजीत शतक झळकावलं. त्यानंतर धाकट्या भावानं घातक गोलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला.
रग्बी खेळणाऱ्या रॉस अडीयरनं झळकावलं पहिलं T20 शतक :मालिकेतील दुसऱ्या आणि शेवटच्या T20 मध्ये दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून आयर्लंडला प्रथम फलंदाजी दिली. जणू ही संधी आयर्लंडनं दोन्ही हातांनी स्विकारली. सलामीवीर रॉस अडीयर आणि पॉल स्टर्लिंग यांनी सलामीच्या विकेटसाठी 137 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी 52 धावा करुन बाद झालेल्या स्टर्लिंगच्या विकेटनं तुटली. पॉल स्टर्लिंग बाद झाला पण रॉस अडीयर अजूनही खेळपट्टीवर होता आणि मोकळेपणानं त्याचे शॉट्स खेळत होता. 30 वर्षीय रॉस अडीयरने रग्बीपासून आपल्या क्रीडा कारकीर्दीची सुरुवात केली. तो पूर्वी रग्बी खेळत होता. पण, त्याला काही दुखापती झाल्यामुळं तो खेळ सोडून क्रिकेटकडं वळावं लागलं. 30 वर्षीय रॉस अडीयरनं आपली वेगवान फलंदाजी दाखवली आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक झळकावल तब्बल. 172.41 च्या दमदार स्ट्राईक रेटनं फलंदाजी करताना त्यानं 58 चेंडूत 9 षटकार आणि 5 चौकारांसह 100 धावा केल्या. रॉस अडीयरच्या T20I कारकिर्दीतील हे पहिलं शतक होतं, ज्याच्या जोरावर आयर्लंड संघानं 20 षटकांत 6 विकेट गमावत 195 धावा केल्या.