नवी दिल्ली Happy Birthday IPL : 18 एप्रिल हा दिवस क्रिकेट जगतासाठी खूप खास आहे. या दिवशी 17 वर्षांपूर्वी चाहत्यांना इंडियन प्रीमियर लीग (IPL) सारखी शानदार स्पर्धा मिळाली. आयपीएल 2008 मध्ये सुरु झालं. हा पहिला हंगाम शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं (RR) जिंकला होता. आयपीएलला आज (18 एप्रिल) 16 वर्षे पूर्ण होत आहेत. 2008 मध्ये या दिवशी या लीगच्या इतिहासातील पहिला सामना बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात झाला होता.
कोलकातानं आरसीबीचा 140 धावांनी केला होता पराभव : पहिल्या हंगामात कोलकाता संघाचं कर्णधारपद सौरव गांगुलीच्या हातात होतं. तर राहुल द्रविड आरसीबीची कमान सांभाळत होता. या पहिल्याच सामन्यात आरसीबीचा संघ सामन्यात माघारलेला दिसत होता. या सामन्यात केकेआरनं प्रथम फलंदाजी करताना 3 विकेट्सवर 222 धावा केल्या होत्या. तर आरसीबीचा संघ 15.1 षटकांत केवळ 82 धावांवर गारद झाला होता. अशा प्रकारे केकेआरनं हा सामना 140 धावांनी जिंकला.
पहिल्याच सामन्यात ब्रेंडन मॅक्युलमचा कहर : पहिल्याच सामन्यात केकेआरचा सलामीवीर ब्रेंडन मॅक्युलमनं अवघ्या 73 चेंडूत नाबाद 158 धावांची शानदार खेळी केली. आरसीबीचा धुव्वा उडवणाऱ्या मॅक्युलमनं 13 षटकार आणि 10 चौकार मारले आणि तो आयपीएलचा पहिला सामनावीरही ठरला.