नवी दिल्ली IPL 2025 Schedule :आयपीएल 2025 चं वेळापत्रक जाहीर झालं असून या हंगामाची सुरुवात 22 मार्च रोजी गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामन्यानं होईल. हा सामना कोलकात्यातील ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर खेळला जाईल तर आयपीएल 2025 चा अंतिम सामनाही 25 मे रोजी त्याच मैदानावर खेळला जाईल. तसंच यावर्षीही काही आयपीएल सामने धर्मशाळा आणि गुवाहाटी इथं होणार आहेत. मुल्लानपूर नंतर धर्मशाळा हे पंजाब किंग्जचं दुसरं होम ग्राउंड असेल तर राजस्थान रॉयल्स जयपूर व्यतिरिक्त गुवाहाटीमध्येही सामने खेळतात.
13 ठिकाणी खेळवले जातील सामने : श्रेयस आणि रिकी पॉन्टिंग यांच्या रुपात नवीन कर्णधार आणि प्रशिक्षक असलेल्या पंजाब किंग्जचा संघ धर्मशाळेत त्यांचे तीन घरचे सामने खेळतील. हिमाचल प्रदेशच्या सुंदर मैदानावर दर हंगामात खेळल्या जाणाऱ्या दोन सामन्यांपेक्षा हे एक जास्त आहे. तसंच त्यांचे उर्वरित चार घरचे सामने पंजाबमधील मुल्लानपूर इथं खेळले जातील. 10 संघांची ही लीग चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यानंतर 12 दिवसांनी 22 मार्च रोजी सुरु होईल आणि 13 ठिकाणी खेळवली जाईल. तसंच या हंगामात एकुण 74 सामने होणार असून 65 दिवस थरार चालणार आहे.
केकेआरच्या कर्णधाराची लवकरच घोषणा : या हंगामात चेन्नईचं नेतृत्व ऋतुराज गायकवाड करेल तर मुंबईचं नेतृत्व हार्दिक पंड्या करेल. श्रेयस अय्यर पंजाब किंग्जमध्ये गेल्यानंतर, केकेआरनं अद्याप कर्णधाराची घोषणा केलेली नाही. आरसीबीचं नेतृत्व फाफ डु प्लेसिसऐवजी रजत पाटीदारकडे असेल. गेल्या वर्षी मेगा लिलाव झाला होता, त्यामुळं आयपीएल 2025 ची आतुरतेनं वाट पाहिली जात आहे. या लिलावात ऋषभ पंत सर्वात महागडा खेळाडू ठरला. पंतला लखनऊ सुपर जायंट्सनं विक्रमी 27 कोटी रुपयांना खरेदी केलं. ऋषभ पंतला नुकतंच लखनऊचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आलं.