मुंबई Player Ban in IPL : इंडियन प्रीमियर लीग (IPL) नं नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या मेगा लिलावापूर्वी खेळाडूंना कायम ठेवण्याबाबत नियम जारी केले आहेत. आता आयपीएल फ्रँचायझी त्यांच्या सध्याच्या संघातील एकूण 6 खेळाडूंना कायम ठेवू शकतात. हे एकतर रिटेंशनद्वारे किंवा राईट टू मॅच (RTM) पर्याय वापरुन केलं जाऊ शकतं. 6 रिटेन्शन/RTM मध्ये जास्तीत जास्त 5 कॅप केलेले खेळाडू (भारतीय आणि परदेशी) आणि जास्तीत जास्त 2 अनकॅप केलेले खेळाडू असू शकतात. त्याच वेळी, आयपीएल 2025 साठी फ्रँचायझीसाठी लिलावाची रक्कम 120 कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे. आयपीएल फ्रँचायझींना 31 ऑक्टोबरपर्यंत कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी सादर करावी लागेल.
परदेशी खेळाडू मध्यभागी येऊ शकणार नाही :दरम्यान, आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलनं एक निर्णय घेतला आहे. यामुळं परदेशी खेळाडूंचे धाबे दणाणले आहेत. वास्तविक, लिलावात निवड झाल्यानंतर हंगामातून काढता पाय घेतलेल्या परदेशी खेळाडूंवर आयपीएलनं बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. वैद्यकीय स्थिती असल्यासच त्याला लीग सोडण्याची परवानगी दिली जाईल. आयपीएलमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये असं दिसून आलं आहे की, खेळाडू टूर्नामेंटच्या मध्येच किंवा आधी निघून जातात.
नोंदणीबाबतही नवा नियम : मेगा लिलावासाठी कोणत्याही परदेशी खेळाडूला नोंदणी करावी लागेल. या मेगा लिलावासाठी परदेशी खेळाडूनं नोंदणी न केल्यास पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएल लिलावात तो नोंदणीसाठी अपात्र ठरेल. यामुळं मिनी लिलावादरम्यान परदेशी खेळाडूंना मोठी कमाई करता येणार नाही. मिनी लिलावामध्ये, फ्रँचायझी त्यांच्या संघातील कोणत्याही संभाव्य उणीवा दूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च करतात. आयपीएल 2024 च्या लिलावादरम्यान हे स्पष्ट झालं जेव्हा कोलकाता नाइट रायडर्सनं स्टार्कला 24.75 कोटी रुपयांना आणि सनरायझर्स हैदराबादनं पॅट कमिन्सला 20.50 कोटी रुपयांना खरेदी केलं.
जेसन रॉयनं घेतलं होतं नाव मागे : इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉयनं वैयक्तिक कारणांमुळं आयपीएल 2024 मधून आपलं नाव मागं घेतलं होतं. कोलकाता नाईट रायडर्सनं त्याला 2.8 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. 2024 च्या हंगामापूर्वी लिलावात सर्वात महागडा खेळाडू ठरलेल्या मिचेल स्टार्कनंही आयपीएल 2018 मधून आपलं नाव काढून घेतलं होतं. मात्र, हे दुखापतीमुळं होतं. या घटना पाहता फ्रँचायझीनं कठोर नियमांची मागणी केली होती. आता आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलनं त्याला मान्यता दिली आहे.
हेही वाचा :
- कानपूर कसोटी: तिसऱ्या दिवशीही पाऊस मांडणार खेळ, आज मॅच होणार की नाही? कसं असेल हवामान; वाचा सविस्तर - Kanpur Weather Day 3