नवी दिल्ली IPL 2024 : देशात आयपीएल 2024 स्पर्धा सुरू होण्यासाठी काही दिवसांचाच अवधी शिल्लक आहे. यावरुनच मागील काही दिवसांपासून ऋषभ पंतच्या कमबॅकच्या नवनव्या तारखा समोर येत असल्याचं बघायला मिळालं. असं असतानाच आता दिल्ली कॅपिटल्स आणि ऋषभ पंतच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. खुद्द बीसीसीआयनं ऋषभ पंतच्या (Rishabh pant ) कमबॅकसाठी ग्रीन सिग्नल दिला असून तो आयपीएलमध्ये सहभागी होण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचं बीसीसीआयनं स्पष्ट केलंय. मात्र, मोहम्मद शमी आणि प्रसिद्ध कृष्णा हे दोघंही आयपीएल खेळण्यासाठी फिट नसल्याचं बीसीसीआयनं म्हटलंय. त्यामुळं गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का बसलाय.
ऋषभ पंतला ग्रीन सिग्नल : भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) मंगळवारी ऋषभ पंतला आगामी इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून खेळण्यासाठी तंदुरुस्त घोषित केलंय. 30 डिसेंबर 2022 ला अपघात झाल्यानंतर ऋषभ पंत मैदानापासून दूर होता. त्यामुळंच आयपीएल 2023 स्पर्धा तसंच वनडे वर्ल्डकप स्पर्धेलाही तो मुकला होता. बीसीसीआयनं पंतला तंदुरुस्त घोषित करताना म्हटलंय की, "30 डिसेंबर 2022 ला उत्तराखंडच्या रुरकीजवळ झालेल्या भीषण रस्ता अपघातानंतर 14 महिन्यांच्या पुनर्वसनानंतर, ऋषभ पंत आता आगामी आयपीएलसाठी तंदुरुस्त आहे." परंतु, मोहम्मद शामी आणि प्रसिद्ध कृष्णा हे दोघं आयपीएल 2024 मध्ये खेळू शकणार नाहीत, असं बीसीसीआयनं आपल्या रिपोर्टमध्ये स्पष्ट केलंय.