मुंबई IPL 2024 MI vs RR : इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 17 व्या हंगामात आज मुंबई इंडियन्स (MI) ची राजस्थान रॉयल्स (RR) विरुद्ध लढत होणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईचा संघ सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात पराभूत झालाय. आता त्याचा हा तिसरा सामना आहे. या हंगामात मुंबई पहिल्यांदाच घरच्या मैदानावर सामना खेळणार आहे. दुसरीकडे, राजस्थानचा संघ चांगल्या फॉर्ममध्ये असून त्यांचा सामना करणं मुंबई इंडियन्ससाठी मोठे आव्हान असेल.
- हार्दिकवर असेल लक्ष : कर्णधारपद मिळाल्यानंतर हार्दिक पांड्या पहिल्यांदाच मुंबईच्या घरच्या मैदानावर मुंबईत प्रेक्षकांचा सामना करणार आहे. मागील दोन सामन्यांदरम्यान स्टेडियममध्ये पांड्याला खूप ट्रोल करण्यात आलं होतं. यानंतर आता मुंबईच्या वानखेडे मैदानावर काय होतं हे पाहावं लागेल.
कर्णधार बदलल्यानं चाहते नाराज : मुंबईचा संघ आयपीएलमध्ये संथ सुरुवातीसाठी ओळखला जातो. पांड्या कर्णधार झाल्यानंतरही यात कोणताही बदल झालेला नाही. या हंगामात रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला कर्णधार बनवण्यात आलं होतं. रोहितनं मुंबई इंडियन्सला 5 वेळा विजेतेपद मिळवून दिलं होतं. त्यामुळं संघाच्या चाहत्यांची नाराजी होती. या अष्टपैलू खेळाडूला सुरुवातीच्या सामन्यांमध्ये प्रेक्षकांच्या नाराजीचाही सामना करावा लागला.
विजयीमार्गावर परतण्याचा मुंबईचा प्रयत्न : पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा गुजरात टायटन्सकडून (GT) 6 धावांनी पराभव झाला होता. यानंतर हैदराबादमध्ये मोठ्या धावसंख्येच्या विक्रमासह झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादनं (SRH) मुंबईचा 32 धावांनी पराभव केला. या दोन पराभवानंतर मुंबई संघ सांघिक गुणतालिकेत तळाच्या 10व्या स्थानावर आहे. जरी हा आयपीएलच्या 17 व्या हंगामाचा प्रारंभिक टप्पा असला तरी मुंबई संघाला पराभवाची मालिका संपवायची आहे. दुखापतीतून सावरत असलेला अनुभवी खेळाडू सूर्यकुमार यादवची मुंबईला उणीव भासत आहे.