IND W vs SA W :भारतीय महिला क्रिकेट संघानं पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर मोठा विजय नोंदवला. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा 143 धावांच्या मोठ्या फरकानं पराभव केला. या विजयासह टीम इंडियानं 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताच्या विजयात स्मृती मानधना आणि आशा शोभनानं मोलाचा वाटा उचलला. स्मृती मानधनानं तिचं सहावं एकदिवसीय शतक (117) झळकावलं. तर लेगस्पिनर आशा शोभनानं पदार्पणाच्या सामन्यात 4 विकेट घेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धमाकेदार एंट्री केलीय.
भारताची फलंदाजी : भारतानं या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतानं 50 षटकात 265 धावा केल्या. भारताकडून सर्वाधिक धावा करणारी सलामीवीर फलंदाज स्मृती मानधना हिनं 127 चेंडूत 12 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं 117 धावा करत शानदार शतक झळकावलं. दीप्ती शर्मानं 37 आणि पूजा वस्त्राकरनं 31 धावांचं योगदान दिलं. 266 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ 37.4 षटकांत केवळ 122 धावांवरच गारद झाला. आफ्रिकेच्या 7 खेळाडूंना दुहेरी आकडाही पार करता आला नाही. स्युने लुसनं सर्वाधिक 33 धावा केल्या.
पदार्पणाच्या सामन्यातच आशा शोभनाची कमाल : 266 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी खूपच निराशाजनक होती. संपूर्ण संघ 37.4 षटकात 122 धावांवर ऑलआऊट झाला. आशा शोभनानं भारतासाठी शानदार गोलंदाजी करत 8.4 षटकांत 21 धावांत 4 बळी घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. याशिवाय दीप्ती शर्मानं 2, रेणुका सिंग, पूजा वस्त्राकार आणि राधा यादवनं प्रत्येकी 1 विकेट घेतली. आशा शोभनानं वयाच्या 33व्या वर्षी आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत पदार्पण केलं. भारतीय महिला क्रिकेट संघात पदार्पण करणारी ती सर्वात वयस्कर क्रिकेटर ठरली. शोभनाच्या भेदक गोलंदाजीमुळं भारतानं दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. महिला प्रीमियर लीग 2024 मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या आशा शोभनानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्याच सामन्यात इतिहास रचला आहे.
महिला प्रीमियर लीगमध्ये अप्रतिम कामगिरी :आशा शोभनानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापूर्वी महिला प्रीमियर लीगमध्ये तिच्या गोलंदाजीनं अप्रतिम कामगिरी दाखवली आहे. महिला प्रीमियर लीग 2024 च्या आशा शोभनानं बंगळुरुसाठी एकूण 10 सामने खेळले. यामध्ये तिनं एकूण 12 विकेट घेतल्या. शोभनाची गेल्या मोसमातील सर्वोत्तम कामगिरी 22 धावांत 5 विकेट्स होती.