पर्थ AUS vs IND 1st Test : पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात, भारतीय संघानं आतापर्यंत संपूर्णपणे वर्चस्व राखलं आहे. ज्यात त्यांनी ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरच्या मैदानावर पूर्णपणे बॅकफूटवर ढकललं आहे. या कसोटी सामन्यात भारतीय संघ पहिल्या डावात 150 धावांपर्यंत मर्यादित राहिला होता, पण त्यानंतर त्यांनी ऑस्ट्रेलियन संघाचा पहिला डाव 104 धावांवर आटोपला, तर दुसऱ्या डावात त्यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली. डाव घोषित केला आणि 487 धावा केल्या. यासह भारतीय संघानं एक ऐतिहासिक कामगिरी देखील केली जी आजपर्यंत भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेटच्या इतिहासात कधीही करु शकला नव्हता.
ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच 500 हून अधिक धावांची आघाडी : पर्थ कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात भारतीय संघाकडून उत्कृष्ट फलंदाजी दिसून आली ज्यात पहिल्या विकेटसाठी 201 धावांची ऐतिहासिक भागीदारी पाहायला मिळाली. केएल राहुलनं 77 धावांची खेळी खेळली, त्यानंतर यशस्वी जैस्वालनं कसोटी कारकिर्दीतील चौथं शतक झळकावलं आणि 161 धावांची उत्कृष्ट खेळी त्याच्या फलंदाजीत पाहायला मिळाली. यानंतर विराट कोहलीलाही बऱ्याच कालावधीनंतर कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावण्यात यश आलं. कोहलीनं 143 चेंडूत 100 धावांची खेळी केली. या जोरावर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला 534 धावांचं लक्ष्य देण्यात यशस्वी ठरली असतानाच कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 500 हून अधिक धावांची आघाडी मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत 500 हून अधिक धावांची आघाडी घेणारे संघ :
- इंग्लंड - 741 धावा (ब्रिस्बेन कसोटी, 1928)
- दक्षिण आफ्रिका - 631 धावा (WACA स्टेडियम, 2012)
- वेस्ट इंडिज - 573 धावा (ॲडलेड स्टेडियम, 1980)
- दक्षिण आफ्रिका - 538 धावा (WACA स्टेडियम, 2016)
- भारत - 533 धावा (पर्थ ऑप्टस स्टेडियम, 2024)