मोकी (चीन) IND vs PAK Hockey : आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही भारतीय हॉकी संघाच्या खेळाडूंनी पॅरिस ऑलिम्पिकमधील फॉर्म कायम ठेवला आहे. चीनमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत भारतीय संघानं पुन्हा एकदा दमदार कामगिरी करत सलग पाचवा विजय मिळवला आहे. गटातील शेवटच्या सामन्यात भारतीय संघानं पाकिस्तानचा 2-1 असा पराभव केला. भारतीय संघानं या स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. संघाच्या विजयाचा हिरो ठरला कर्णधार हरमनप्रीत सिंग, यानं पेनल्टी कॉर्नरद्वारे 2 गोल केले. पाकिस्ताननं सामन्यात पहिला गोल केला असला तरी भारतीय संघानं दमदार पुनरागमन करत सामना 2-1 असा जिंकला.
पाकिस्तानचा पहिला गोल, भारताचे दोन :भारत आणि पाकिस्तानचे संघ 350 दिवसांनंतर सामना खेळत होते. खेळ सुरु होताच पाकिस्ताननं आक्रमणाला सुरुवात केली आणि सातव्या मिनिटाला हन्नान शाहिदच्या सहाय्यानं गोल नोंदवत 1-0 अशी आघाडी घेतली. मात्र, भारतानं पुनरागमन करण्यास विलंब लावला नाही. भारताचा कर्णधार हरमनप्रीत सिंगनं 13व्या मिनिटाला भारतासाठी पहिला गोल करत सामना 1-1 असा बरोबरीत आणला. दुसऱ्या क्वार्टरमध्ये खेळाच्या 19व्या मिनिटाला भारतीय संघाला पुन्हा पेनल्टी कॉर्नर मिळाला, त्यानंतर भारतीय संघाच्या 'सरपंच'नं सामन्यातील दुसरा गोल केला. यासह भारतानं पाकिस्तानविरुद्ध 2-1 अशी आघाडी घेतली. हीच आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली.