हैदराबाद Highest Victory Margin for India in T20I :भारतीय क्रिकेट संघानं बांगलादेश विरद्ध कसोटी मालिका जिंकल्यानंतर T20 मालिकाही जिंकली आहे. भारताने कसोटी मालिका2-0 नं जिंकली. तर T20 मालिका 3-0 अशी जिंकली आहे. भारतीय संघ आणि बांगलादेश यांच्यात हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या T20 सामन्यात भारतीय संघानं 133 धावांनी दणदणीत विजय मिळवला. जो भारतीय संघाचा धावांच्या बाबतीत सर्वात मोठा तिसरा विजय ठरला. संजू सॅमसन त्याच्या शतकामुळं सामनावीर ठरला. तर हार्दिक पांड्याला प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कार देण्यात आला.
भारताची विक्रमी धावसंख्या :या सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमारनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात भारतीय संघानं 297 धावांचा हिमालय उभारला. जी भारतीय संघाची T20 इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या ठरली. तर कसोटी खेळणाऱ्या देशांमध्ये कोणत्याही संघाची आंतरराष्ट्रीय T20 मध्ये ही सर्वोच्च धावसंख्या होती. भारताकडून संजू सॅमसन (111), सूर्यकुमार यादव (75) आणि हार्दिक पांड्या (47) यांनी तुफानी खेळी खेळली. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ खेळायला आला आणि लक्ष्याच्या खूप मागे राहिला. बांगलादेश संघानं 20 षटकांत केवळ 164/7 धावा केल्या.
बांगलादेशचे फलंदाज अपयशी : भारताच्या विक्रमी धावसंख्येसमोर बांगलादेशच्या डावाची सुरुवात खूपच खराब झाली, त्यांचा फलंदाज परवेझ हुसेन (0) सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर मयांक यादवचा बळी ठरला. काही वेळानं वॉशिंग्टन सुंदरला गोलंदाजांनी देण्यात आले, त्यानं आपल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर (चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर) तनजीद हसनला (15) झेलबाद केले. तनजीद बाद झाला तेव्हा बांगलादेशची धावसंख्या केवळ 35 धावा होती. बांगलादेशच्या डावाच्या विकेट्स सातत्यानं पडत होत्या, 59 च्या धावसंख्येवर कर्णधार नझमुल हुसेन शांतो (14) यष्टिरक्षक संजू सॅमसनकरवी झेलबाद झाला. यानंतर सातत्यानं बांगलादेशच्या विकेट पडत राहिल्या. परिणामी त्यांना मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं.
आंतरराष्ट्रीय T20 मध्ये संघाची सर्वोच्च धावसंख्या :
- 314/3 - नेपाळ विरुद्ध मंगोलिया, हांगझोऊ, 2023
- 297/6 - भारत विरुद्ध बांगलादेश, हैदराबाद, 2024
- 278/3 - अफगाणिस्तान विरुद्ध आयर्लंड, डेहराडून, 2019
- 278/4 – झेक प्रजासत्ताक विरुद्ध तुर्कीये, इल्फोव्ह काउंटी, 2019
- 268/4 - मलेशिया विरुद्ध थायलंड, हांगझोऊ, 2023
- 267/3 - इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज, तरोबा, 2023
आंतरराष्ट्रीय T20 सामन्याच्या एका डावात सर्वाधिक बाऊंड्री :
- 47 - भारत विरुद्ध बांगलादेश, हैदराबाद, 2024
- 43 - झेक प्रजासत्ताक विरुद्ध तुर्किए, इल्फोव्ह काउंटी, 2019
- 42 - दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज, सेंच्युरियन, 2023
- 42 - भारत विरुद्ध श्रीलंका, इंदूर, 2017
- 41 - श्रीलंका विरुद्ध केनिया, जोहान्सबर्ग, 2007
- 41 - अफगाणिस्तान विरुद्ध आयर्लंड, डेहराडून, 2019
आंतरराष्ट्रीय T20 सामन्याच्या एका डावात सर्वाधिक षटकार :
- 26 - नेपाळ विरुद्ध मंगोलिया, हांगझोऊ, 2023
- 23 - जपान विरुद्ध चीन, मोंग कॉक, 2024
- 22 - अफगाणिस्तान विरुद्ध आयर्लंड, डेहराडून, 2019
- 22 - वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका, सेंच्युरियन, 2023
- 22 - भारत विरुद्ध बांगलादेश, हैदराबाद, 2024