महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ जाहीर; 752 च्या सरासरीनं रन बनवणाऱ्या खेळाडूला संघात स्थान नाही - INDIAN CRICKET TEAM

बहुप्रतिक्षित ICC चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. निवड समितीच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत संघाची घोषणा केली.

Team India For ICC Champions Trophy
टीम इंडिया (ANI Photo)

By ETV Bharat Sports Team

Published : Jan 18, 2025, 3:00 PM IST

Updated : Jan 18, 2025, 3:32 PM IST

मुंबई Team India For ICC Champions Trophy :बहुप्रतिक्षित ICC चॅम्पियन्स ट्रॉफी येत्या 19 फेब्रुवारीपासून सुरु होईल. ही स्पर्धा 19 फेब्रुवारी ते 9 मार्च 2025 दरम्यान खेळवली जाईल. ही स्पर्धा पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) संयुक्तपणे आयोजित करतील. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) यासाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. निवड समितीच्या बैठकीनंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी पत्रकार परिषद घेत संघाची घोषणा केली. यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफीपुर्वी होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठीही संघाची घोषणा करण्यात आली. रोहित शर्माला अपेक्षितपणे संघाचा कर्णधार बनवण्यात आलं आहे. तर शुभमन गीलला उपकर्णधार बनवण्यात आलंय.

संघाची कमान रोहितच्या हातात : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी रोहित शर्माला टीम इंडियाचा कर्णधार बनवण्यात आलं आहे. भारताच्या 15 सदस्यीय संघात जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांचाही समावेश करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर बुमराहला दुखापत झाली होती आणि तो शेवटच्या कसोटीच्या दुसऱ्या डावात गोलंदाजी करु शकला नव्हता, त्यानंतर तो चॅम्पियन्स ट्रॉफीच्या गट टप्प्यातून बाहेर पडू शकतो अशी अटकळ होती, परंतु आता संघाच्या घोषणेनंतर हे स्पष्ट झालं आहे की तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि संपूर्ण स्पर्धा खेळेल.

सिराज संघाबाहेर : दुसरीकडे, मोहम्मद शमी 14 महिन्यांनंतर भारतीय वनडे संघात परतला आहे. शमीनं नोव्हेंबर 2023 मध्ये वनडे विश्वचषकात टीम इंडियासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. शमीप्रमाणेच बुमराह देखील 14 महिन्यांनी वनडे संघात परतला आहे. मोहम्मद सिराजचा संघात समावेश नाही. त्याच्या जागी अर्शदीप सिंगला संधी देण्यात आली आहे. वॉशिंग्टन सुंदर आणि हार्दिक पंड्या यांना अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात स्थान देण्यात आलं आहे. कुलदीप यादवही संघात आहे. यशस्वी जयस्वालचा प्रथमच वनडे संघात समावेश करण्यात आला आहे.

करुण नायरला संघात स्थान नाही :सध्या सुरु असलेल्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत भारताचा फलंदाज करुण नायर यानं तब्बल 752 च्या सरासरीनं धावा काढत सर्वांचं लक्ष्य वेधलं आहे. त्याला संघात घेण्यावरुन वाद-विवाद सुरु होता, मात्र आज निवड झालेल्या संघात त्याला स्थान देण्यात आलेलं नाही. त्याऐवजी एकही वनडे सामना न खेळलेल्या यशस्वी जैस्वालला संघात घेतलं आहे.

15 सामने रंगणार : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये 8 संघांमध्ये एकूण 15 सामने होतील. संघांना 2 गटात विभागण्यात आलं आहे. भारत आणि पाकिस्तान एकाच गट-अ मध्ये आहेत. त्यांच्यासोबत इतर दोन संघ न्यूझीलंड आणि बांगलादेश आहेत. तर दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि इंग्लंड यांना गट ब मध्ये स्थान देण्यात आलं आहे. सर्व 8 संघ आपापल्या गटात 3-3 सामने खेळतील. यानंतर, प्रत्येक गटातील टॉप-2 संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. पहिला उपांत्य सामना दुबईमध्ये होईल, तर दुसरा लाहोरमध्ये. यानंतर अंतिम सामना खेळवला जाईल. अशा परिस्थितीत, जर एखादा संघ अंतिम फेरीत पोहोचला तर तो स्पर्धेत एकूण 5 सामने खेळेल.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी 15 सदस्यीय भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, यशस्वी जयस्वाल, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप. यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी गट :

  • गट अ - पाकिस्तान, भारत, न्यूझीलंड, बांगलादेश
  • गट ब - दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, इंग्लंड

चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताचे सामने :

  • 20 फेब्रुवारी - बांगलादेश विरुद्ध भारत, दुबई
  • 23 फेब्रुवारी - पाकिस्तान विरुद्ध भारत, दुबई
  • 2 मार्च - न्यूझीलंड विरुद्ध भारत, दुबई

हेही वाचा :

  1. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा, निवड समितीची प्रेस कॉन्फरन्स 'इथं' पाहा लाईव्ह
  2. कांगारुंसमोर इंग्रजांचं 'पानिपत'... वनडे मालिकेत पाहुण्यांना क्लीन स्वीप
Last Updated : Jan 18, 2025, 3:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details