बीड Kho-Kho World Cup :भारतात सुरु असलेल्या खो-खो विश्वचषकात यजमान भारतीय महिला खो-खो संघानं उपांत्यपूर्व फेरीत बांगलादेशचा धुव्वा उडवला. यासह भारतानं उपांत्य फेरीत धडक मारली आहे. परिणामी भारताचं वर्ल्डकप जेतेपद फक्त दोन विजय दूर आहे. भारतानं चौथ्या सामन्यात 100 गुणांचा आकडा पार केला आहे. भारताचा उपांत्य फेरीत सामना दक्षिण अफ्रिकेशी होणार आहे.
कसा झाला सामना : भारतीय महिला संघानं उपांत्यपूर्व फेरीत जबरदस्त खेळी केली. भारतीय कर्णधार प्रियांका इंगळे हीनं नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम अटॅक करण्याचा निर्णय केला. यानंतर पहिल्या डावात भारतानं एकही ड्रीम रन दिला नाही. त्यामुळं पहिल्या डावात भारतानं 50-0 अशी आघाडी मिळवली होती. ही आघाडी कमी करण्याचं मोठं आव्हान बांगलादेशपुढं होतं. पण बांगलादेशनं हा फरक कमी करण्याऐवजी 06 ड्रिम पॉईंट्स दिले. तर अटॅक करताना फक्त 08 गुण मिळवले. म्हणजेच दुसऱ्या डावात बांगलादेशकडे फक्त 02 गुण होते. तर भारताकडे 48 गुणांची आघाडी होती.
भारताचा दणदणीत विजय : यानंतर तिसऱ्या डावात अटॅक करताना भारतानं आक्रमक अटॅक केला. एका पाठोपाठ एक बॅच तंबूत पाठवत होते. त्यामुळं भारताच्या पारड्यात एका पाठोपाठ एक गुण मिळत होते. तिसऱ्या डावात भारताकडे 106 गुण होते. परिणामी तिसऱ्या डावातच भारताचा विजय पक्का झाला होता. कारण 98 धावांची आघाडी भारताकडे होती. चौथ्या डावात अटॅक करून 98 धावांचा फरक कमी करणं कठीण होतं. त्यात भारतानं चौथ्या डावातही ड्रीम रनही मिळवला. यासह भारताने हा सामना 109-16 गुणांनी जिंकला.
उपांत्यपूर्व फेरीचे निकाल :
- पहिला उपांत्यपूर्व सामना : युगांडाचा न्यूझीलंडवर 71-26 नं विजय
- दुसरा उपांत्यपूर्व सामना : दक्षिण आफ्रिकेचा केनियावर 51-46 नं विजय
- तिसरा उपांत्यपूर्व सामना : नेपाळचा इराणवर 109-08 नं विजय
- चौथा उपांत्यपूर्व सामना : भारताचा बांगलादेशवर 109-16 नं विजय.
हेही वाचा :
- चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा, निवड समितीची प्रेस कॉन्फरन्स 'इथं' पाहा लाईव्ह
- कांगारुंसमोर इंग्रजांचं 'पानिपत'... वनडे मालिकेत पाहुण्यांना क्लीन स्वीप