हरारे IND vs ZIM T20I : टी 20 क्रिकेट विश्वचषकानंतर आता भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पाच सामन्यांतील टी 20 मालिकेतील पहिला सामना आज हरारे इथं झाला. या सामन्यात यजमान झिम्बाब्वेनं 13 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी 116 धावांचं लक्ष्य होतं. पण हे छोटं लक्ष्यही त्यांना गाठता आलं नाही. भारतीय संघ 19.5 षटकांत 102 धावांवरच मर्यादित राहिला. झिम्बाब्वेविरुद्धच्या टी 20 मधील भारतीय संघाचा हा केवळ तिसरा पराभव ठरला. तर 2024 या वर्षात भारतीय संघाचा पहिलाच पराभव ठरला.
फलंदाजांचं अपयश : सामन्याच्या शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी 16 धावा करायच्या होत्या आणि ते षटक तेंडाई चतारानं टाकलं. त्या षटकात विजय निश्चित करण्याची जबाबदारी वॉशिंग्टन सुंदरवर होती, पण तो केवळ दोन धावा करु शकला आणि पाचव्या चेंडूवर तो बाद झाला. भारतीय संघाच्या पराभवाचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्या फलंदाजांची खराब कामगिरी, अव्वल फळीतील फलंदाजांपैकी फक्त कर्णधार शुभमन गिल काही काळ क्रीजवर राहू शकला. गिलनं 31 धावांची खेळी खेळली. गिलशिवाय अवेश खान (16) आणि वॉशिंग्टन सुंदर (27) यांनाच दुहेरी आकडा गाठता आला. इतर फलंदाज मात्र सपशेल अपयशी ठरले.
रवी बिश्नोईची घातक गोलंदाजी : तत्पूर्वी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेनं 9 गड्यांच्या मोबदल्यात 115 धावा केल्या होत्या. झिम्बाब्वेसाठी क्लाईव्ह मदंडेनं 29 धावांची नाबाद खेळी खेळली. यादरम्यान त्यानं 25 चेंडूंचा सामना केला आणि चार चौकार मारले. याशिवाय डिओन मायर्सनं 23 धावांचं, ब्रायन बेनेटनं 22 धावांचे आणि वेस्ली मधवेरेनं 21 धावांचं योगदान दिलं. या चौघांशिवाय एकाही फलंदाजाला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. भारताकडून फिरकीपटू रवी बिश्नोईनं सर्वाधिक चार बळी घेतले.
टी 20 सामन्यांमध्ये भारताची सर्वांत कमी धावसंख्या :
- 74 विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मेलबर्न 2008
- 79 विरुद्ध न्यूझीलंड, नागपूर 2016
- 92 विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कटक 2016
- 101 विरुद्ध श्रीलंका, पुणे 2016
- 102 विरुद्ध झिम्बाब्वे, हरारे 2024
टी 20 मध्ये झिम्बाब्वेचा सर्वात कमी धावसंख्येचा यशस्वीपणे बचाव :
- 105 विरुद्ध वेस्ट इंडीज पोर्ट ऑफ स्पेन 2010
- 115 विरुद्ध भारत हरारे 2024*
- 117 विरुद्ध आयर्लंड डब्लिन 2021
- 118 विरुद्ध पाक हरारे 2021
- 124 विरुद्ध आयर्लंड ब्रॅडी 2021