India vs Sri lanka 3rd T20 :भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना मंगळवारी (30 जुलै) पल्लेकेले येथे खेळण्यात आला. सुपर ओव्हरमध्ये पोहोचलेला सामना भारतानं जिंकून मालिका 3-0 अशा फरकानं खिशात घातली. हा सामना बरोबरीत सुटल्यामुळे सुपर ओव्हरनं विजयी संघाची निवड करण्यात आली.
भारतानं श्रीलंकेवर सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला. सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेच्या संघानं भारताला विजयासाठी 3 धावांचं आव्हान दिलं होतं. कर्णधार सूर्यकुमारनं पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकून भारताला विजय मिळवून दिला.
भारताची फलंदाजी :नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्याभारतीय संघानं 20 षटकात 9 विकेट गमावत 137 धावा केल्या. यशस्वी जैस्वाल (10), संजू सॅमसन (0), रिंकू सिंग (1), सूर्यकुमार (8) आणि शिवम दुबे (13) हे फलंदाज अपयशी ठरले. भारतीय संघाची धावसंख्या 8.4 षटकात 5 विकेट 48 धावा होती. त्यानंतर शुभमन गिल आणि रियान पराग या दोघांनी डावाची धुरा सांभाळली. दोन्ही खेळाडूंनी सहाव्या विकेटसाठी 40 चेंडूत 54 धावांची भागीदारी केली. गिलनं 37 चेंडूत 39 धावा तर रियान परागनं 18 चेंडूत 26 धावांची खेळी खेळली. शेवटच्या षटकांमध्ये वॉशिंग्टन सुंदरनं 18 चेंडूत 25 धावा करत भारताचा विजय सोपा केला. श्रीलंकेकडून महिष तिक्षानानं 3 विकेट आणि वानिंदू हसरंगाने 2 विकेट घेतले.
रिंकूची जबरदस्त गोलंदाजी :भारतानं दिलेल्या 138 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या संघांनं 18 व्या षटकापर्यंत सामन्यावर घट्ट पकड मिळवली होती. पाथुम निसांका 26 आणि कुसल मेंडीसच्या 43 धावांच्या जोरावर श्रीलंकेची विजयाच्या दिशेनं कूच सुरू होती. शेवटच्या 2 षटकांत श्रीलंकेला अवघ्या 9 धावांची गरज होती. मैदानात कुसल परेराची तडाखेबंद फलंदाजी सुरू होती. त्यामुळे श्रीलंकेला हा सामना सहज जिंकेल असं वाटत होतं. सूर्यानं 19 वे षटक रिंकू सिंहला दिले. सूर्याच्या या निर्णयामुळे सर्वांनाच धक्का बसला. रिंकूनं आपल्या षटकांत 3 धावांच्या मोबदल्यात 2 विकेट घेतल्या. त्यानं कुसल परेरा (46) रमेश मेंडीस (3) या दोघांना पवेलियनमध्ये पाठवलं.