मुंबई :"आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारतानं विराट कोहलीच्या 'विराट' शतकाच्या जोरावर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडवला. भारतानं पाकिस्तानचा 6 गडी राखून पराभव केलाच. या पराभवामुळे पाकिस्तानवर स्पर्धेतून बाहेर फेकलं जाण्याची नामुष्की ओढवली. विराट कोहलीची अप्रतिम फलंदाजी, कर्णधार रोहित शर्माची रणनीती आणि त्याला गोलंदाज, फलंदाजांची साथ यामुळे भारतानं हा भन्नाट विजय मिळवला. भारतीय संघ एक रणनीती आखून खेळताना दिसला. भारताविरुद्ध खेळताना कायम दबावाखाली खेळणाऱ्या पाकिस्तानी संघावर भारतीय संघानं आणखी दबाव टाकला. त्यामुळे पाकिस्तानचा पराभव झाला," अशी प्रतिक्रिया कर्णधार रोहित शर्मा याचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी दिली. "पुढच्या फेरीत दिग्गज संघांशी सामना होणार आहे. विजयासाठी या संघांना लोळवावं लागणार आहेच. भारतीय संघ जसा खेळत आहे, तसंच खेळत राहावं," असं मत दिनेश लाड यांनी ईटीव्ही भारतशी साधलेल्या एक्स्क्लूसिव्ह संवादात व्यक्त केलं.
पाकिस्तानचा संघ युद्ध लढत आहोत, अशा दबावात खेळला ? :भारताच्या विजयावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय, यावर दिनेश लाड यांनी सांगितलं की, "पाकिस्तानचा संघ भारताविरुद्ध कायम दबावात खेळतो. फलंदाजी करतानाही ते दबावात होते. त्यामुळे त्यांच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. गोलंदाजीमध्येही त्यांच्यावर दडपण आलं. त्याउलट भारतीय खेळाडू कोणत्याही दडपणाविना खेळले. भारत-पाकिस्तान सामना म्हटलं की त्यांचे खेळाडू जणू काही युद्ध लढत आहोत, अशा दबावात असतात. त्यामुळेच त्यांचा पराभव झाला," असं दिनेश लाड म्हणाले. पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवान आणि सौद शकील यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, रिझवान बाद झाल्यानंतर त्यांचा डाव कोसळला. मधल्या फळीत नवखे फलंदाज अपयशी ठरले, यावर लाड म्हणाले की, "हे खरं आहे. त्यांच्या मधल्या फळीत नवखे फलंदाज आहेत. ते दडपण हाताळण्यात अपयशी ठरले. त्यांच्याकडून चुका झाल्या. भारतीय संघ फलंदाजी करतानाही हेच जाणवलं. दडपणामुळेच त्यांनी दोन महत्त्वाचे झेल सोडले."
शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि हारिस राऊफ यांच्यासाठी खास रणनीती होती का ? :भारतीय संघानं आक्रमक सुरूवात केली. पाकिस्तानचे स्टार गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह आणि हारिस राऊफ हे खरं तर भारतासाठी यापूर्वी डोकेदुखी ठरले आहेत. त्यांच्यासाठी या लढतीत खास रणनीती दिसली का, या प्रश्नावर दिनेश लाड यांनी सांगितलं की, "एक रणनीती नक्कीच दिसली. या गोलंदाजांना स्थिरावू द्यायचंच नाही. रोहित, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, विराट आणि शेवटी आलेला हार्दिक पांड्या यांनी तिन्ही प्रमुख गोलंदाजांवर आक्रमण केलं. सुरूवातीला रोहित आणि गिल यांनी आक्रमक फलंदाजी केली. नंतर विराट, श्रेयस आणि पांड्या यांनीही तोच कित्ता गिरवला. हीच रणनीती गेम चेंजर ठरली."