महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

न्यूझीलंडविरुद्ध भारतच वरचढ... कसोटी क्रिकेटमध्ये निर्विवाद वर्चस्व; एकदा आकडेवारी पाहाच

भारतीय क्रिकेट संघाला 16 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. यातील पहिला सामना 16 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे.

By ETV Bharat Sports Team

Published : 5 hours ago

IND vs NZ 1st Test Preview
भारतीय क्रिकेट संघ (AP Photo)

मुंबई IND vs NZ 1st Test Preview : भारतीय क्रिकेट संघ न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेचं यजमानपदासाठी सज्ज झाला आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टीनं ही मालिका दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची आहे. भारताला 16 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. पुढील वर्षी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2025 चा अंतिम सामना खेळण्यासाठी भारताला आगामी 8 कसोटी सामन्यांपैकी 5 जिंकणं आवश्यक आहे. भारताला न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका 3-0 अशी जिंकावी लागणार आहे. यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताला किमान दोन सामने जिंकावे लागतील. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना 16 ऑक्टोबर रोजी बेंगळुरु इथं, दुसरा कसोटी सामना 24 ऑक्टोबर रोजी पुण्यात, तर तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना 1 नोव्हेंबर रोजी मुंबईत खेळवला जाईल.

भारत आणि न्यूझीलंडचं हेड-टू-हेड कसोटी रेकॉर्ड कसा : पुढील 5 कसोटी सामने जिंकून भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना पुढील वर्षी 11 जून ते 15 जून दरम्यान लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळवला जाईल. जर आपण भारत आणि न्यूझीलंडच्या हेड टू हेड कसोटी रेकॉर्डबद्दल बोललो तर भारतीय संघाचा यात वरचष्मा दिसतो. वास्तविक, दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 62 कसोटी सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी 22 सामन्यांचा निकाल भारताच्या बाजूनं लागला आहे, तर केवळ 13 सामने न्यूझीलंडनं जिंकले आहेत. त्याचबरोबर 27 कसोटी सामन्यांचा निकाल अनिर्णित राहिला आहे.

घरच्या मैदानात भारताचं वर्चस्व : भारतानं न्यूझीलंडविरुद्ध घरच्या भूमीवर 17 कसोटी सामने जिंकले आहेत. तसंच भारतानं अद्याप घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या सर्व कसोटी मालिकेत भारतीय संघाचा वरचष्मा आहे. भारतानं न्यूझीलंडविरुद्ध 12 कसोटी मालिका जिंकल्या आहेत, तर किवी संघानं कसोटी मालिकेत 7 वेळा भारताचा पराभव केला आहे. यात जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या पहिल्या आवृत्तीच्या अंतिम सामन्याचाही समावेश आहे, ज्यात न्यूझीलंडनं इंग्लंडमध्ये भारताचा पराभव करुन प्रथमच जागतिक कसोटी चॅम्पियनशिप जिंकली होती.

मालिकेसाठी न्यूझीलंडचा कसोटी संघ : भारतीय दौऱ्यासाठी न्यूझीलंडच्या कसोटी संघाबद्दल बोलायचं तर त्यात टॉम लॅथम (कर्णधार), टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), मायकेल ब्रेसवेल (पहिल्या कसोटीसाठी), मार्क चॅपमन, डेव्हन कॉनवे, मॅट हेन्री, डॅरिल मिशेल, विल्यम ओ'रुर्के यांचा समावेश आहे. तसंच एजाज पटेल, मिचेल सँटनर, बेन सियर्स, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, ईश सोधी, टिम साऊदी, केन विल्यमसन आणि विल यंग यांनाही संघात स्थान मिळालं आहे.

भारताचा कसोटी संघ : जर भारतीय संघाच्या कसोटी संघाबद्दल बोलायचं झालं तर, रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि आकाशदीप यांचा समावेश आहे.

हेही वाचा :

  1. बेंगळुरुत मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत; भारत-न्यूझीलंड कसोटीवर पावसाचं सावट, कसं असेल हवामान? वाचा सविस्तर
  2. विराट-रोहितला खेळताना स्टेडियममध्ये बघायचं? रेल्वे तिकिटापेक्षा स्वस्तात मॅचचं तिकिट; 'असं' खरेदी करा ऑनलाइन आणि ऑफलाइन

ABOUT THE AUTHOR

...view details