चेन्नई INDW vs SAW Only Test : भारतीय महिला क्रिकेट संघानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चेन्नई कसोटीत विक्रमांवर विक्रम प्रस्थापित केले आहेत. या सामन्याच्या पहिल्या दिवशी स्मृती मंधाना आणि शेफाली वर्मा यांनी विक्रमी भागिदारी केली, तर दुसऱ्या दिवशी भारतीय संघानं महिला कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वोच्च धावसंख्या उभारली. भारतानं सहा गडी गमावून 603 धावा केल्या आणि आपला पहिला डाव घोषित केला. डाव घोषित केला नसता तर याहून अधिक धावा होऊ शकल्या असत्या.
भारतीय संघानं केला विश्वविक्रम : महिलांच्या कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. त्यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नऊ विकेट्स गमावून 575 धावा केल्या होत्या. हा सामना पर्थमध्ये खेळला गेला. मात्र आज सकाळी 109व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर ऋचा घोषनं चौकार मारताच भारतीय महिला संघ कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा संघ बनला. या चौकारासह संघाची धावसंख्या 579 वर पोहोचली. त्यानंतर संघाची धावसंख्या 603 पर्यंत पोहोचल्यावर हरमनप्रीत कौरनं डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला.
स्मृती मंधाना आणि शेफाली यांनीही केला विक्रम :तत्पूर्वी, सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करताना दिसले. स्मृती मंधाना आणि शेफाली वर्मा यांनी आक्रमक फलंदाजी करत विक्रमी भागीदारी केली. या दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 292 धावांची भागीदारी झाली. महिलांच्या कसोटीतील ही सर्वात मोठी भागीदारी आहे. तर कोणत्याही विकेटसाठी ही दुसरी सर्वोच्च भागीदारी आहे. मंधाना 149 धावा करुन बाद झाली तर शेफाली 206 धावा करुन बाद झाली.