कानपूर IND vs BAN 2nd Test Day 4 : भारत आणि बांगलादेश क्रिकेट संघ यांच्यातील कानपूर कसोटी सामन्याचा आज (30 सप्टेंबर) चौथा दिवस आहे. बांगलादेशचा पहिला डाव 233 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात भारतीय संघानं पहिला डाव 9 बाद 285 धावांवर घोषित केला. भारतानं तुफानी खेळ करत अवघ्या 34.4 षटकांत या धावा केल्या. पहिल्या डावाच्या आधारे भारताला 52 धावांची आघाडी मिळाली. प्रत्युत्तरात बांगलादेशचा दुसरा डाव सुरु आहे. बांगलादेशची धावसंख्या 26 धावा आहे आणि त्यांच्या 2 विकेट पडल्या आहेत. सध्या शदमान इस्लाम आणि मोमिनुल हक क्रीजवर आहेत. अजून बांगलादेश भारतापेक्षा 26 धावांनी मागे आहे. आता या कसोटीचा पाचवा दिवस निर्णायक ठरणार आहे.
सामन्यात पावसाचा व्यत्यय : या सामन्यात पावसाचा व्यत्यय पाहायला मिळाला. दुसऱ्या दिवशी पावसानं तर तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसामुळं मैदान ओलं झालं होतं एकही चेंडू टाकला गेला नाही. तर खराब प्रकाश आणि पावसामुळं पहिल्या दिवशी केवळ 35 षटकंच खेळता आली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं बांगलादेशविरुद्ध चेन्नई कसोटी सामना 280 धावांनी जिंकला. यात रविचंद्रन अश्विनने अप्रतिम अष्टपैलू कामगिरी केली होती. यासह भारत या मालिकेत 1-0 नं पुढं आहे.