कोलंबो SL vs IND 3rd ODI : श्रीलंकेने एकदिवसीय मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताचा 110 धावांनी पराभव केला. भारताला हा सामना जिंकून मालिकेत बरोबरीत करण्याची संधी होती. पण भारताच्या फलंदाजांनी खराब कामगिरी केली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेनं 249 धावांचं लक्ष्य ठेवलं होते. यजमान संघाच्या फिरकीपटूंसमोर भारतीय संघ 26.1 षटकांत 138 धावांत गारद झाला. या विजयासह यजमान श्रीलंका संघाने एकदिवसीय मालिका 2-0 ने खिशात घातली.
टीम इंडियाची फलंदाजी खराब झाली :श्रीलंकेविरुद्धच्या या मालिकेत भारताचे अनेक फलंदाज फ्लॉप ठरले. या सामन्यात रोहित शर्माने संघाला चांगली सुरुवात देण्याचा प्रयत्न केला. त्याने 20 चेंडूत 35 धावा केल्या. यादरम्यान त्याने 6 चौकार आणि 1 षटकार लगावला. शुभमन गिल 6 धावा करून बाद झाला. विराट कोहली 20 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने 18 चेंडूंचा सामना केला आणि 4 चौकार मारले. ऋषभ पंत 6 धावा, श्रेयस अय्यर 8 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. अक्षर पटेल 2 धावा तर रियान पराग 15 धावा करून बाद झाला.
अविष्का फर्नांडो दमदार फलंदाजी :प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेनं 50 षटकांत 7 गडी गमावून 248 धावा केल्या. अविष्का फर्नांडोने शानदार फलंदाजी केली. त्यानं 102 चेंडूंचा सामना करत 9 चौकार आणि 2 षटकार ठोकत 96 धावा केल्या. पथुम निसांकानं 45 धावा, कुसल मेंडिस 59 धावा तर कामिंदू मेंडिसने नाबाद 23 धावा केल्या. समरविक्रमा शून्यावर बाद झाला.