ब्रिजटाऊन (बार्बाडेस) IND vs SA T20 World Cup Final :टी-20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून विजेतेपदावर कब्जा केला. बार्बाडोस इथं खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतानं आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषकावर नाव कोरत इतिहास रचला. यापूर्वी भारतीय संघानं 2007 मध्ये महेंद्रसिगं धोनीच्या नेतृत्वाखाली पहिलाच टी-20 विश्वचषक जिंकला होता.
अंतिम सामन्यात भारतीय संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतानं आपल्या निर्धारित 20 षटकात 7 बाद 176 धावांची मजल मारली. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्याच षटकात पहिला धक्का बसला. जसप्रीत बुमराहनं रिझा हेंड्रिक्सला बोल्ड केलं. यानंतर अर्शदीपनं मार्करमला बाद करत आफ्रिकेला दुसरा धक्का दिला. मात्र यानंतर क्विंटन डी कॉक आणि ट्रिस्टन स्टब्स यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली. मात्र यानंतर अक्षर पटेलनं स्टब्सला बाद करत ही जोडी तोडली. यानंतर क्विंटन डी कॉकनं आक्रमक फटके मारायला सुरुवात केली. मात्र धोकादायक वाटणाऱ्या क्विंटन डी कॉकला अर्शदीपनं बाद केलं. यानंतर हेनरिक क्लासेननं आक्रमक अर्धशतक करत आपल्या संघाला विजयाच्या समीप नेलं. मात्र आफ्रिकेला विजय मिळवता आला नाही.
कोहलीचं शानदार अर्धशतक : अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघानं 7 गडी गमावून 176 धावा केल्या. एकवेळ भारतीय संघानं 34 धावांत 3 विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर विराट कोहलीनं सावध खेळ करत पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अक्षर पटेलसोबत 72 धावांची भागीदारी केली. यानंतर कोहलीनं 48 चेंडूत आपलं अर्धशतक केले. त्याचं या विश्वचषकातील हे पहिलंच अर्धशतक होतं. कोहलीनं 59 चेंडूत एकूण 76 धावा केल्या. तर अक्षर 31 चेंडूत 47 धावा करुन बाद झाला. शेवटी शिवम दुबेनं 16 चेंडूत 27 धावा केल्या. दुसरीकडे, आफ्रिकेकडून फिरकी गोलंदाज केशव महाराज आणि वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्सियानं प्रत्येकी 2 बळी घेतले. तर मार्को जॅनसेन आणि कागिसो रबाडा यांनी 1-1 विकेट घेतली. आतापर्यंत झालेल्या टी 20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील ही सर्वाधिक धावसंख्या आहे. यापुर्वी ऑस्ट्रेलियानं 2021 च्या टी 20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात न्युझीलंडविरुद्ध 173 धावा केल्या होत्या. हा विक्रम भारतीय संघानं मोडला आहे.
टी 20 विश्वचषक 2024 मध्ये भारतीय संघाचा प्रवास :
- सामना क्रमांक 1: भारतानं 46 चेंडू बाकी असताना आयर्लंडचा 8 गडी राखून पराभव केला.
- सामना क्रमांक 2: न्यूयॉर्कमध्ये भारतानं पाकिस्तानचा 6 धावांनी पराभव केला
- सामना क्रमांक 3: भारतानं अमेरिकेविरुद्धचा सामना 10 चेंडू शिल्लक असताना 7 विकेटनं जिंकला.
- सामना क्रमांक 4: फ्लोरिडामध्ये कॅनडासोबतचा भारताचा सामना पावसामुळं रद्द झाला
- सामना क्रमांक 5: भारतानं अफगाणिस्तानचा 47 धावांनी पराभव केला.
- सामना क्रमांक 6: भारतानं बांगलादेशचा 50 धावांनी पराभव केला.
- सामना क्रमांक 7: भारतानं ऑस्ट्रेलियाचा 24 धावांनी पराभव केला.
- सामना क्रमांक 8: भारतानं उपांत्य फेरीत इंग्लंडचा 68 धावांनी पराभव केला. (उपांत्य फेरी)