मुंबई Rishabh Pant Record : भारत आणि न्यूझीलंड क्रिकेट संघ यांच्यातील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरु आहे. पहिल्या दिवशी 86 धावांवर 4 विकेट गमावल्यानंतर ऋषभ पंत आणि शुभमन गिल यांनी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाला शानदार सुरुवात करुन दिली. दुसऱ्या दिवशी पहिलाच षटकात पंतनं सलग दोन चौकार मारुन भारताला चांगली सुरुवात मिळवून दिली. एजाज पटेल दिवसाचं पहिलं षटक टाकण्यासाठी आला, ज्यात पंतनं तीन चौकार मारुन आपली रणनिती स्पष्ट केली. दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीसह, पंतनं स्फोटक पद्धतीनं फलंदाजी सुरु ठेवली आणि आधीच क्रीजवर असलेल्या शुभमन गिलच्या आधी लगेचच आपलं अर्धशतक पूर्ण केलं. पंतनं अवघ्या 36 चेंडूत अर्धशतक झळकावत कसोटी क्रिकेटमध्ये नवा विक्रम रचला.
पंतनं रचले अनेक विक्रम : या सामन्यात शुभमन गिलनं 30 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर आपलं सातवं कसोटी अर्धशतक पूर्ण केलं. गिलनं 66 चेंडूत अर्धशतक ठोकलं. मात्र पंतनं अवघ्या 36 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं आणि न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीत सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला. पंतनं यशस्वी जैस्वालचा विक्रम मोडला. या मालिकेतील दुसऱ्या कसोटीत जयस्वालनं ही मोठी कामगिरी केली होती. पुण्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात जैस्वालनं अवघ्या 41 चेंडूत अर्धशतक झळकावलं होतं. तसंच या अर्धशतकासह पंतनं महेंद्रसिंग धोनीचा मोठा विक्रम मोडला. धोनीला मागे टाकत कसोटी सामन्यांमध्ये 100 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटसह 50 हून अधिक धावा करणारा पंत हा दुसरा यष्टिरक्षक बनला आहे. पंतनं आता कसोटी क्रिकेटमध्ये 100+ स्ट्राइक रेटनं पाचवेळा 50 हून अधिक धावा केल्या आहेत. भारतासाठी सर्वाधिक कामगिरी करणारा तो तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे.
कसोटी सामन्यांमध्ये 100+ स्ट्राइक रेटनं सर्वाधिक 50 हून अधिक धावा करणारे यष्टिरक्षक :
- 8 - ॲडम गिलख्रिस्ट
- 5 - ऋषभ पंत*
- 4 - एमएस धोनी
- 4 - जॉनी बेअरस्टो*