धर्मशाला Ravichandran Ashwin 100th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात धर्मशाला इथं कसोटी क्रिकेट सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात भारताकडून खेळणाऱ्या रविचंद्रन अश्विन यानं नवीन विक्रम स्थापित केला आहे. रविचंद्रन अश्विन हा 100 कसोटी क्रिकेट खेळणारा तिसरा भारतीय फिरकीपटू ठरला आहे. भारत आणि इंग्लंड संघात मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना धर्मशाला इथं खेळवला जात आहे. या सामन्यात 100 कसोटी क्रिकेट सामने खेळणारा रविचंद्रन अश्विन हा 14वा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. तर अश्विनसह जॉनी बेअरस्टोचाही हा 100 वा कसोटी क्रिकेट सामना आहे.
अश्विनला देण्यात आली विशेष कॅप :शंभरावा कसोटी सामना खेळणाऱ्या फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याला आज विशेष कॅप देण्यात आली आहे. भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याच्या हस्ते अश्विनला हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर पत्नी पृथ्वी अश्विन आणि दोन मुलींच्या उपस्थितीत ही विशेष कॅप देण्यात आली. या कॅपवर 100 असं लिहिलेलं आहे. त्यामुळं रविचंद्रन अश्विनसाठी हा मोठा आनंदाचा क्षण आहे. ही विशेष कॅप स्वीकारताना अश्विन मोठा भावूक झाल्याचं दिसून आलं.