रांची IND vs ENG 4th Test 2nd Day : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना रांची येथे खेळवला जात आहे. शनिवारी खेळल्या जात असलेल्या समान्याचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशीही इंग्लंडचं सामन्यात वर्चस्व दिसून आलंय. इंग्लंडनं पहिल्या डावात 353 धावां केल्या. प्रत्युत्तरात भारताची अवस्था बिकट दिसत आहे. खेळ थांबला तेव्हा, भारतानं 73 षटकांत 7 गडी गमावून 219 धावा केल्या. ध्रुव जुरेल तसंच कुलदीप यादव क्रिजवर आहेत. दोघांनी आठव्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी केली आहे. जुरेल 20 तसंच कुलदीप 17 धावांवर नाबाद आहे.
रोहित शर्माच्या रूपानं भारताला पहिला धक्का : भारताला पहिला धक्का कर्णधार रोहित शर्माच्या रूपानं बसला. हिटमॅनला इंग्लंडचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसननं 2 धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यानंतर यशस्वी जैस्वाल- शुभमन गिल यांनी डावाची धुरा सांभाळत दुसऱ्या विकेटसाठी 82 धावांची भागीदारी केली. बशीरनं 25व्या षटकात शुभमन गिलला एलबीडब्ल्यू करून भारताला दुसरा धक्का दिला. गिल धावा करून बाद झाला. यानंतर बशीरनं 35व्या षटकात रजत पाटीदार (17) तसंच 37व्या षटकात रवींद्र जडेजा (12) यांना पायचीत केलं. बशीरनं 47व्या षटकात यशस्वीला बोल्ड केलं. टॉम हार्टलीनं 52 व्या षटकात सर्फराज खान (14) तसंच 56व्या षटकात आर. अश्विनला (1)बाद केले.
जो रूटनं दिलं महत्त्वपूर्ण योगदान :इंग्लंडच्या डावाबद्दल बोलायचं झालं तर, जो रूटनं 122 धावांची नाबाद खेळी करत संघाला 353 धावांपर्यंत नेण्यात महत्त्वाचं योगदान दिलं. भारताकडून रवींद्र जडेजानं सर्वाधिक 4 बळी घेतले, तर आकाशदीपनं 3 बळी घेतले. इंग्लंडच्या संघानं दुसऱ्या दिवसाच्या खेळाची सुरुवात 7 गडी गमावून 302 धावांवर केली. दुसऱ्या दिवशी संघानं 51 धावा जोडल्या. भारताकडून शेवटच्या तीन विकेट जडेजानं मिळवल्या. जड्डूनं सर्वप्रथम रूट-रॉबिन्सनची शतकी भागीदारी मोडली. रॉबिन्सन वैयक्तिक 58 धावांवर बाद झाला. यानंतर जडेजानं शोएब बशीर आणि जेम्स अँडरसनची विकेट मिळवली केली.