राजकोट :Ravichandran Ashwin 500 Test Wickets : भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या राजकोट कसोटी सामन्यात ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने इतिहास रचला आहे. अश्विनने कसोटीत 500 बळी पूर्ण केले आहेत. अश्विनने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज (16 फेब्रुवारी) जॅक क्रॉलीला बाद करून ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 500 बळी घेणारा अश्विन हा दुसरा गोलंदाज आहे. अश्विनने 98 व्या कसोटी सामन्यात ही कामगिरी केली आहे. कसोटीत सर्वात जलद 500 बळी घेण्याचा विक्रम मुथय्या मुरलीधरनच्या नावावर आहे, ज्याने 87 व्या कसोटीत ही अनोखी कामगिरी केली. तर, माजी भारतीय कर्णधार अनिल कुंबळेनं 105 कसोटी सामन्यांमध्ये हा विक्रम केला होता आणि ऑस्ट्रेलियाचा दिवंगत फिरकी गोलंदाज शेन वॉर्नने आपल्या 108व्या कसोटीत हा विक्रम केला होता. म्हणजेच सर्वात वेगवान 500 बळी घेण्याच्या बाबतीत रविचंद्रननं वॉर्न आणि कुंबळेला मागे टाकलं आहे. आता तो जगातील दुसरा कसोटीमध्ये फास्ट विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे.
भारतासाठी 500 बळी घेणारे गोलंदाज
- अनिल कुंबळे - सामने: 131, विकेट्स: 619
- रविचंद्रन अश्विन - सामने: 98, विकेट्स: 500
जागतिक क्रिकेटमध्ये 500 कसोटी बळी घेणारे गोलंदाज
- मुथय्या मुरलीधरन *(श्रीलंका) - विकेट - 800
- शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया) – विकेट्स 708
- जेम्स अँडरसन* (इंग्लंड) – विकेट्स 690
- अनिल कुंबळे (भारत)- 619 विकेट्स
- स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड) – 604 विकेट्स
- ग्लेन मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया) – 563 विकेट्स
- कोर्टनी वॉल्श (वेस्ट इंडिज) - 519
- नॅथन लिऑन* (ऑस्ट्रेलिया) – विकेट्स 517
- रविचंद्रन अश्विन* (भारत) - 500 विकेट्स
एका सामन्यात दहा दहापेक्षा जास्त विकेट्स : तमिळनाडूच्या या फिरकीपटूने नोव्हेंबर 2011 मध्ये दिल्लीत वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले आणि तेव्हापासून तो भारतीय संघाचा नियमित सदस्य आहे. कसोटीत त्याने 24 पेक्षा कमी सरासरीने विकेट्स घेतल्या आहेत. अश्विनने 34 वेळा एका डावात पाच किंवा त्याहून अधिक विकेट्स आणि आठ वेळा एका सामन्यात दहा किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत.