विशाखापट्टणम INd vs ENG 2nd Test: इंग्लंडनं शुक्रवारपासून विशाखापट्टणम इथं सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हन यादी जाहीर केलीय. दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडनं आपल्या संघात दोन बदल केले आहेत. अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनचं पुनरागमन झालंय, तर फिरकी गोलंदाज शोएब बशीरला पदार्पणाची संधी मिळालीय. हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत इंग्लंडच्या संघानं पहिल्या डावात 190 धावांनी मागं पडूनही 28 धावांनी विजय मिळवला होता.
फिरकीला अनुकूल खेळपट्टी राहणार : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना 2 ते 6 फेब्रुवारी दरम्यान विशाखापट्टणम येथील डॉ वायएस राजशेखर रेड्डी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. इथंही फिरकीसाठी अनुकूल खेळपट्टी राहण्याची शक्यता आहे. पाच सामन्यांच्या या मालिकेत इंग्लंडचा संघ 1-0 नं आघाडीवर आहे.
अनुभवी जेम्स अँडरसनचं पुनरागमन : इंग्लंडचा मुख्य फिरकीपटू जॅक लीच दुखापतीमुळं दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडलाय. अशा परिस्थितीत त्याच्या जागी युवा फिरकी गोलंदाज शोएब बशीरला पदार्पणाची संधी मिळालीय. याशिवाय मार्क वुडच्या जागी वरिष्ठ वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनचंही संघात पुनरागमन झालंय. दुसऱ्या कसोटीतही इंग्लंडचा संघ तीन फिरकीपटू आणि एका वेगवान गोलंदाजासह मैदानात उतरणार आहे.