विशाखापट्टणम IND vs ENG 2nd Test : विशाखापट्टणम इथं सुरू असलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव 253 धावांवर आटोपलाय. त्यामुळं भारतीय संघाला 143 धावांची आघाडी मिळालीय. यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाच्या सलामीवीरांनी 5 षटकांत बिनबाद 28 धावा केल्या. यामुळं दिवसअखेर भारत 171 धावांनी आघाडीवर आहे. तत्पुर्वी जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीसमोर इंग्लिश फलंदाज हतबल आणि असहाय्य झाल्याचं दिसत होतं. जसप्रीत बुमराहनं इंग्लंडच्या 6 फलंदाजांना बाद केलंय. याशिवाय कुलदीप यादवनंही 3 बळी घेतले. तर अक्षर पटेलला 1 बळी मिळाला.
बुमराहसमोर इंग्लिश फलंदाजांनी टेकले गुडघे : आज दुसऱ्या दिवशी भारतानं युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालच्या द्विशतकाच्या जोरावर भारतानं 396 धावा केल्या. यानंतर प्रत्युत्तरात फलंदाजीला आलेल्या इंग्लंडची सुरुवात चांगली झाली. इंग्लंडचे सलामीवीर बेन डकेट आणि झॅक क्रॉलीनं पहिल्या विकेटसाठी 59 धावांची भागीदारी केली. यानंतर बेन डकेट 21 धावा करुन बाद झाला. यानंतर 114 धावांवर साहेबांना दुसरा धक्का बसला. झॅक क्रॉली 76 धावा करुन अक्षर पटेलचा बळी ठरला. यानंतर ठराविक अंतरानं इंग्लंडटचे फलंदाज बाद होत राहिले.
झॅक क्रॉलीची शानदार खेळी :इंग्लंडकडून सलामीवीर झॅक क्रॉलीनं सर्वाधिक 76 धावा केल्या. यानंतर इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्सनं 47 धावांची खेळी केली. मात्र उर्वरित फलंदाजांनी घोर निराशा केली. इंग्लिश फलंदाज ठराविक अंतरानं बाद होत राहिले. ओली पोप, जॉनी बेअरस्टो आणि बेन फॉक्ससारखे फलंदाज स्वस्तात बाद झाले.