चेन्नई India Playing 11 For 1st Test vs BAN : पाच महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर भारतीय क्रिकेट संघ पुन्हा एकदा लाल बॉल क्रिकेटच्या मैदानात उतरत आहे. बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका 19 सप्टेंबरपासून सुरु होत आहे. या मालिकेची पहिली कसोटी चेन्नईत होणार असून, भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनचा मोठा प्रश्न आहे. अखेर बांगलादेशविरुद्ध मैदानात उतरणारे 11 खेळाडू कोण असतील? या प्रश्नाचं उत्तर नाणेफेकीच्या वेळी अधिकृतपणे समोर येईल, मात्र बांगलादेशविरुद्ध प्रथमच कसोटी खेळण्याची संधी अनेक खेळाडूंना मिळणार हे मात्र निश्चित.
3 फिरकीपटू आणि 2 वेगवान गोलंदाजांसह उतरणार भारत : चेन्नईच्या खेळपट्टीची स्थिती पाहिल्यास, भारत 3 फिरकीपटू आणि 2 वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरु शकतो. म्हणजेच, नंतर 6 खेळाडू फलंदाज असतील, ज्यात एक यष्टीरक्षक असेल, ऋषभ पंत संघात असेल म्हणजे तो यष्टीरक्षक फलंदाज म्हणून प्लेइंग इलेव्हनचा भाग असेल. याचाच अर्थ इंग्लंडविरुद्धच्या मायदेशातील कसोटी मालिकेत छाप सोडणाऱ्या ध्रुव जुरेलला बेंचवर बसावं लागण्याची शक्यता आहे.
असा असू शकतो फलंदाजीचा क्रम : बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत युवा डावखुरा फलंदाज यशस्वी जैस्वाल कर्णधार रोहित शर्मासह भारतीय सलामीची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे. त्यांच्याशिवाय शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करु शकतो. त्यानंतर विराट कोहली, केएल राहुल आणि ऋषभ पंत असतील.
हे गोलंदाज असू शकतात संघात : गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर आर अश्विन आणि जडेजा हे चेन्नईतील भारतीय संघ व्यवस्थापनाची पहिली पसंत असू शकतात. त्याचबरोबर तिसरा फिरकीपटू म्हणून अक्षर पटेल किंवा कुलदीप यादव यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकतो. भारतीय संघ ज्या दोन वेगवान गोलंदाजांसोबत जाऊ शकते, त्यापैकी एक जसप्रीत बुमराह आणि दुसरा मोहम्मद सिराज असू शकतो.