सेंट लुसिया IND vs AUS T20I World Cup : भारतीय संघाच्या टी 20 विश्वचषकाच्या सुपर-8 फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध सेंट लुसिया येथील डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात अनेक विक्रम झाले. या सामन्यात भारतीय संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करायला आला. यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मानं या सामन्यात आपल्या संघाला वेगवान सुरुवात करण्याचं काम केलं. या सामन्यात त्यानं अवघ्या 41 चेंडूत 92 धावा केल्या. आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधील आपल्या सहाव्या शतकापासून तो आठ धावांनी हुकला असला तरी त्यानं या सामन्यात षटकारांचं द्विशतक पुर्ण करत नवा इतिहास रचलाय.
रोहित शर्मानं आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास : या सामन्यात रोहित शर्मानं स्फोटक सुरुवात केली. त्यानं मिचेल स्टार्कच्या एकाच षटकात 4 षटकारांसह 29 धावा वसूल केल्या. या खेळीत रोहितनं आठ षटकार लगावले, यासह त्यानं नवा इतिहास रचला. त्यानं आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये 200 षटकार पूर्ण केले आहेत. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 200 षटकार पूर्ण करणारा तो जगातील पहिला आणि एकमेव फलंदाज ठरला. यापूर्वी कोणत्याही फलंदाजाला हा कारनामा करता आलेला नाही.
आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज :
- 203* षटकार - रोहित शर्मा (भारत)
- 173 षटकार - मार्टिन गुप्टिल (न्यूझीलंड)
- 137 षटकार - जोस बटलर (इंग्लंड)
- 132 षटकार - निकोलस पूरन (वेस्ट इंडिज)
- 130 षटकार - ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया)
रोहितनं मोडला बाबर आझमचा विक्रम : रोहित शर्मानं या सामन्यात 92 धावांची खेळी खेळून पाकिस्तानच्या बाबर आझमचा विक्रम मोडला आणि आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला. रोहित शर्माच्या आता आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये 157 सामन्यांत 4165 धावा आहेत तर बाबर आझमच्या 123 सामन्यांत 4145 धावा आहेत. या यादीत विराट कोहली 4103 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा :
- रोहित शर्मा – 4165 धावा
- बाबर आझम- 4145 धावा
- विराट कोहली- 4103 धावा
टी 20 विश्वचषकात भारतासाठी सर्वात मोठी खेळी खेळणारा रोहित दुसरा फलंदाज : रोहितनं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत विक्रम केले. 92 धावांची खेळी खेळून, तो टी 20 विश्वचषकात भारतासाठी सर्वोच्च खेळी खेळणारा दुसरा फलंदाज ठरला. या यादीत सुरेश रैना आघाडीवर आहे. त्यानं 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 101 धावांची तुफानी खेळी खेळली होती.
कोणत्याही संघाविरुद्ध सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज : डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवरील या सामन्यात भारतीय कर्णधारानं दमदार कामगिरी केली. त्यानं वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ख्रिस गेलचा विक्रम मोडला आहे. आता त्याच्या नावावर एका संघाविरुद्ध 132 षटकार नोंदवले गेले आहेत. त्याचवेळी गेलनं इंग्लंडविरुद्ध 130 षटकार ठोकले होते. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर रोहित शर्माच आहे. त्यानं वेस्ट इंडिजविरुद्ध 88 षटकार मारले आहेत.
रोहितनं युवराजचा मोडला विक्रम : या सामन्यात भारतीय कर्णधार जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत होता. त्यानं युवराज सिंगचा 17 वर्षे जुना विक्रम मोडला. युवराजनं 2007 च्या टी 20 विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध सात षटकार मारले होते. रोहितनं या सामन्यात आठ षटकार मारुन त्याचा विक्रम मोडीत काढला.
टी 20 विश्वचषकात कर्णधाराची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या :
- 98 धावा - ख्रिस गेल विरुद्ध भारत, ब्रिजटाऊन 2010
- 92 धावा - रोहित शर्मा विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ग्रोस आयलेट 2024
- 88 धावा - ख्रिस गेल विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ओव्हल 2009
- 85 धावा - केन विल्यमसन विरुद्ध ऑस्ट्रेलिया, दुबई 2021
टी 20 विश्वचषकात भारतासाठी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या :
- 101 धावा - सुरेश रैना विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ग्रॉस आयलेट, 2010
- 92 धावा - रोहित शर्मा विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ग्रॉस आयलेट, 2024
- 89* धावा - विराट कोहली विरुद्ध वेस्ट इंडिज, वानखेडे स्टेडियम, मुंबई 2016
- 82* धावा - विराट कोहली विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मोहाली 2022
- 82* धावा - विराट कोहली विरुद्ध पाकिस्तान, मेलबर्न 2022
हेही वाचा :
- झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा; विश्वचषक संघातील दोन खेळाडूंना संधी, 'हा' खेळाडू कर्णधार - Team India
- वनडे विश्वचषकाचा बदला घेण्यासाठी 'रोहितसेना' सज्ज; कांगारूं संघाचं करणार पॅकअप? - T20 World Cup 2024
- टी 20 विश्वचषकातून यजमान संघ बाहेर; नऊ हंगामात 'ही' परंपरा कायम - T20 World Cup