दुबई ICC Rankings : भारतीय क्रिकेट संघ आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या गेलेल्या एकदिवसीय मालिकेनंतर आयसीसीनं नवीन क्रमवारी जाहीर केली आहे. दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माला जबरदस्त फायदा झाला आहे. मात्र, भारताचा उपकर्णधार शुभमन गिल याला थोडासा फटका बसला आहे. पाकिस्तानच्या बाबर आझमचं क्रमांक एकचं स्थान अजूनही अबाधित आहे. (ICC Rankings Latest news in Marathi)
आयसीसी क्रमवारी (Screen shot on ICC Website) रोहित शर्मा एकदिवसीय क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर : आयसीसीनं जाहीर केलेल्या नव्या क्रमवारीत पाकिस्तानचा बाबर आझम पहिल्या क्रमांकावर आहे. बाबर आझमचं रेटिंग सध्या 824 आहे. भारताचा रोहित शर्मा आता एका स्थानाच्या झेप घेऊन दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याचं रेटिंग आता 765 पर्यंत वाढलं आहे. दरम्यान, शुभमन गिलला एक स्थान गमवावं लागलं असून, तो थेट दुसऱ्या स्थानावरुन तिसऱ्या स्थानावर गेला आहे. त्याचं रेटिंग 763 पर्यंत घसरलं आहे. म्हणजे रोहित आणि शुभमन जवळपास बरोबरीवर आहेत, कोणताही खेळाडू कधीही स्थान बदलू शकतो.
विराट कोहली चौथ्या क्रमांकावर : भारताचा विराट कोहली आता चौथ्या क्रमांकावर आहे. मात्र, त्याच्या रेटिंगमध्ये थोडीशी घसरण झाली आहे. कोहलीचं रेटिंग आता 746 वर पोहोचलं आहे. आयर्लंडच्या हॅरी टॅक्टरचंही रेटिंग समान आहे. तो कोहलीसोबत संयुक्तपणे चौथ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडचा डॅरिल मिशेल 728 रेटिंगसह सहाव्या क्रमांकावर कायम आहे. डेव्हिड वॉर्नर 723 रेटिंगसह सातव्या क्रमांकावर कायम आहे. श्रीलंकेच्या पाथुम निसांकालाही एका स्थानाचा फायदा झाला आहे. तो आता 708 रेटिंगसह आठव्या क्रमांकावर आला आहे.
डेव्हिड मलानचंही नुकसान : इंग्लंडच्या डेव्हिड मलानला एका जागेचा फटका बसला आहे. तो आता 707 रेटिंगसह नवव्या क्रमांकावर आला आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा रॉसी वँडर ड्युसेन 701 रेटिंगसह 10 व्या क्रमांकावर आहे. टीम इंडियाचे खेळाडू आता बरेच दिवस एकही एकदिवसीय सामना खेळणार नाहीत. अशा परिस्थितीत त्याच्या रेटिंगमध्ये सध्या कोणताही बदल होणार नाही. खेळणाऱ्या इतर खेळाडूंच्या रेटिंगवर त्याचा काय परिणाम होतो हे पाहायचं आहे.
हेही वाचा :
- दिनेश कार्तिकनं 39व्या वर्षी बनवला अनोखा विक्रम; 'या' टी-20 लीगमध्ये सामील होणारा पहिलाच भारतीय क्रिकेटपटू - Dinesh Karthik joins paarl royals
- भारत-श्रीलंका एकदिवसीय मालिकेत रचला गेला अनोखा 'विक्रम'; पहिल्यांदाच इतके खेळाडू 'अशा' पद्धतीनं झाले 'आउट' - IND vs SL ODI