नवी दिल्ली ICCTeam Of The Year : आयसीसीनं मंगळवारी 2023 चा एकदिवसीय संघ (ODI Team Of The Year) आणि कसोटी संघ (Test Team Of The Year) जाहीर केला. एकदिवसीय संघात तब्बल 6 भारतीय खेळाडूंनी स्थान मिळवलं असून, कसोटी संघात केवळ 2 भारतीयांचा समावेश करण्यात आलाय. वनडे टीमचं नेतृत्व रोहित शर्माकडे देण्यात आलंय, तर कसोटी संघाची धुरा ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सकडे आहे.
वनडे संघात 6 भारतीयांना स्थान : 2023 च्या एकदिवसीय संघात रोहित शर्मा आणि शुभमन गिलकडे सलामीची जबाबदारी आहे. या दोघांशिवाय भारताच्या विराट कोहली, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि मोहम्मद शमी यांचा संघात समावेश करण्यात आलाय. 2023 विश्वचषकात विराट कोहलीनं सर्वाधिक 765 धावा ठोकल्या होत्या. हा एका विश्वचषकात सर्वाधिक धावांचा विक्रम आहे. या खास कामगिरीसाठी त्याची 'प्लेअर ऑफ टूर्नामेंट' म्हणून निवड करण्यात आली होती. तर मोहम्मद शमी 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता. त्यानं स्पर्धेत एकूण 24 बळी घेतले होते.
टीममध्ये हे विदेशी खेळाडू : ODI टीम ऑफ द इयर मध्ये, वर्ल्ड कप फायनलमध्ये शतक झळकावणारा ऑस्ट्रलियाचा ट्रॅव्हिस हेड आणि फिरकीपटू अॅडम झाम्पाचाही समावेश आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज हेनरिक क्लासेन आणि गोलंदाज मार्को जॅनसेन, तसंच न्यूझीलंडच्या डॅरिल मिशेललाही आयसीसीच्या या 11 सदस्यीय संघात स्थान मिळालं आहे. मिशेलनं 2023 च्या विश्वचषकात चमकदार कामगिरी केली होती.
कसोटी संघात ऑस्ट्रेलियाचा दबदबा : आयसीसी कसोटी संघात, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप विजेत्या ऑस्ट्रेलियाचा दबदबा आहे. या टीममध्ये 5 कांगारू खेळाडूंना स्थान मिळालंय. उस्मान ख्वाजा, ट्रॅव्हिस हेड, पॅट कमिन्स, अॅक्स केरी आणि मिचेल स्टार्क हे पाच खेळाडू आहेत. याशिवाय, संघात भारत आणि इंग्लंडचे प्रत्येकी 2 खेळाडू, तर श्रीलंका आणि न्यूझीलंडच्या 1-1 खेळाडूंचा समावेश आहे.
कसोटी संघात फक्त 2 भारतीय खेळाडू : आयसीसी कसोटी संघात रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन या दोनच भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. अष्टपैलू रवींद्र जडेजानं वर्षाची सुरुवात शानदार केली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपूर कसोटीत त्यानं 5 विकेट आणि 1 अर्धशतक झळकावलं. त्यानंतर पुढच्या सामन्यात त्यानं 10 विकेट घेतल्या. तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये, जडेजानं 4 विकेट्ससह 48 धावा करत चांगलं योगदान दिलं होतं.
अश्विनची कामगिरी : रविचंद्रन अश्विन बॉर्डर-गावस्कर मालिकेत भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज होता. त्यानं 4 सामन्यात 25 विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या WTC 2023 फायनलमध्ये अश्विनचा प्लेइंग-11 मध्ये समावेश करण्यात आला नव्हता. परंतु त्यानंतर त्यानं वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 12 विकेट्स (5/60 आणि 7/71) घेऊन संघात पुनरागमन केलं. यानंतर, पुढच्या सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावलं आणि 3 बळीही घेतले.
ICC ODI टीम ऑफ द इयर :रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ट्रॅव्हिस हेड (ऑस्ट्रेलिया), विराट कोहली, डॅरिल मिशेल (न्यूझीलंड), हेनरिक क्लासेन (दक्षिण आफ्रिका), मार्को जॅन्सेन (दक्षिण आफ्रिका), अॅडम झाम्पा (ऑस्ट्रेलिया), मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी
ICC टेस्ट टीम ऑफ द इयर :उस्मान ख्वाजा (ऑस्ट्रेलिया), दिमुथ करुणारत्ने (श्रीलंका), केन विल्यमसन (श्रीलंका), जो रूट (इंग्लंड), ट्रॅव्हिस हेड (ऑस्ट्रेलिया), रवींद्र जडेजा (भारत), अॅलेक्स केरी (विकेटकीपर, ऑस्ट्रेलिया), पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया), कर्णधार), रविचंद्रन अश्विन (भारत), मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया) आणि स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड).
हे वाचलंत का :
- इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, विराट कोहली पहिल्या दोन कसोटीतून बाहेर
- केएस भरतनं प्रभू श्रीरामाला समर्पित केलं शतक, सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
- सानियानंच शोएब मलिकपासून विभक्त होण्याची इच्छा व्यक्त केली? घटस्फोटाचं नेमकं कारण काय?