लाहोर Highest Individual Score in Champions Trophy : अफगाणिस्तानचा युवा सलामीवीर इब्राहिम झद्राननं इंग्लंडविरुद्धच्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात ऐतिहासिक शतक झळकावलं आहे. संघाचा सलामीवीर झद्राननं या स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक वयक्तिक धावा केल्या आहेत. त्यानं इंग्लंडचा फलंदाज बेन डकेटचा विक्रम मोडित काढला आहे. तसंच चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत शतक करणारा तो पहिला अफगाणिस्तानी फलंदाज ठरला आहे. लाहोरमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्ताननं सुरुवातीला तीन विकेट गमावल्यानंतर, 23 वर्षीय तरुण सलामीवीर झद्राननं डावाची सूत्रं हाती घेतली आणि नंतर वेग वाढवत शानदार शतक ठोकलं. इब्राहिमनं त्याच्या वनडे कारकिर्दीतील सहावं शतक झळकावलं आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अफगाणिस्तानसाठी शतकाचं खातंही उघडलं. या सामन्यात इब्राहिम झद्रानच्या शतकाच्या बळावर अफगाणिस्ताननं 325 धावंचा डोंगर उभारला आहे, आता इंग्लंडला आपलं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी 326 धावांचा मोठा पल्ला गाठावा लागणार आहे.
शानदार शतकी खेळी : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आठव्या सामन्यात इंग्लंडचा सामना लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर अफगाणिस्तानशी झाला. ग्रुप बी मधील हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा होता कारण दोघांनाही त्यांच्या पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. अशा परिस्थितीत विजय आवश्यक होता आणि अशा वेळी अफगाणिस्तानच्या या प्रतिभावान फलंदाजानं प्रथम आपल्या संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले आणि नंतर हे शानदार शतक झळकावून आणखी एक कामगिरी आपल्या नावावर केली.
झद्राननं केला विश्वविक्रम : झद्राननं 106 चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं आणि अशा प्रकारे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शतक करणारा अफगाणिस्तानचा पहिला फलंदाज बनला. त्यानं 6 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीनं त्याच्या वनडे कारकिर्दीतील सहावं शतक झळकावलं. यासह, तो वनडे विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शतक करणारा पहिला अफगाणिस्तानी फलंदाज बनला. शतक पूर्ण केल्यानंतर काही वेळातच, अफगाण फलंदाजानं चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बेन डकेटचा सर्वाधिक धावांचा विश्वविक्रम मोडला. 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात डकेटनं इंग्लंडकडून ऑस्ट्रेलियाविरुद्ध 165 धावांची खेळी केली. काही दिवसांनंतर, झद्राननं 177 धावांचा टप्पा गाठून एक विश्वविक्रम रचला.
चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या :
- 177 - इब्राहिम झद्रान विरुद्ध इंग्लंड, लाहोर (2025)
- 165 - बेन डकेट विरुद्ध ऑस्ट्रेलिया लाहोर (2025)
- 145* - नॅथन अॅस्टल विरुद्ध अमेरिका द ओव्हल (2004)