हैदराबाद Mohammad Siraj DSP : भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याची तेलंगणात पोलीस महासंचालक (DGP) यांच्या देखरेखीखाली पोलीस उपअधीक्षक (DSP) पदी नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्रवारी डीजीपी कार्यालयात इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तेलंगणाचे पोलीस महासंचालक जितेंद्र यांची भेट घेतल्यानंतर सिराजनं औपचारिकपणे पदभार स्वीकारला. तेलंगणाचे पोलीस महासंचालक जितेंद्र यांनी शुक्रवारी हैदराबाद येथील डीजीपी कार्यालयात भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद सिराजला पोलीस उपअधीक्षक म्हणून नियुक्ती पत्र सुपूर्द केलं.
तेलंगणा सरकारनं केली घोषणा : वेस्ट इंडिजमधील बार्बाडोस इथं झालेल्या T20 विश्वचषकात भारताच्या विजयात हातभार लावल्यानंतर सिराज हैदराबादेत परतल्यावर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी त्याला बक्षीसासह एक भूखंड आणि सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली होती. यानंतर रेवंत रेड्डी यांनी आपलं वचन पूर्ण करत मोहम्मद सिराजची नियुक्ती केली आहे. सिराजचा सध्या भारतातील पहिल्या तीन वेगवान गोलंदाजांमध्ये समावेश आहे आणि तो भारतीय संघाकडून कसोटी क्रिकेट खेळत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. 2020-21 मध्ये ऑस्ट्रेलियात पदार्पण केल्यापासून, सिराजने त्याच्या क्रमवारीत सातत्याने सुधारणा केली आहे.
मोहम्मद सिराजला किती मिळेल पगार? : इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, तेलंगणा पोलिसांमध्ये DSP ची वेतनश्रेणी 58850 रुपये ते 137050 रुपये आहे. या वेतनश्रेणीसोबतच मोहम्मद सिराजला डीएसपींना देण्यात येणाऱ्या सर्व सुविधाही मिळणार आहेत. त्याला सरकारकडून घरभाडे भत्ता, वैद्यकीय भत्ता आणि प्रवास भत्ता यासह इतर सुविधाही मिळतील.