दुबई ICC Champions Trophy 2025 : अनेक महिन्यांपासून वाट पाहणारा क्षण अखेर आला आहे. पुढील वर्षी होणाऱ्या ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 बाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन पाकिस्ताननं केलं आहे, ज्यासाठी भारतीय क्रिकेट संघानं पाकिस्तानच्या भूमीवर पाऊल ठेवण्यास नकार दिला होता, त्यानंतर अनेक महिने बीसीसीआय आणि पीसीबी यांच्यात रस्सीखेच सुरु राहिली आणि आता दोन्ही बोर्डांनी हायब्रिड मॉडेलवर सहमती दर्शविली आहे. आयसीसीनं चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत अधिकृत घोषणा केली आहे. ICC च्या मते, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पाकिस्तानमध्ये आणि तटस्थ ठिकाणी खेळवली जाईल.
लवकरच जाहीर होणार वेळापत्रक :चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चं वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहितीही आयसीसीनं दिली आहे. मात्र, भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने कोणत्या देशात आणि कोणत्या ठिकाणी खेळणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. परंतु, स्थळांवरील अनिश्चिततेमुळं स्पर्धेचं वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही. विशेष म्हणजे या स्पर्धेत आठ संघ सहभागी होणार असून, त्यांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचतील.
भारत-पाकिस्तान तटस्थ ठिकाणी भिडणार : ICC बोर्डानं गुरुवारी 19 डिसेंबर रोजी पुष्टी केली की 2024-2027 दरम्यान कोणत्याही देशानं आयोजित केलेल्या ICC कार्यक्रमांमध्ये भारत आणि पाकिस्तानचे सामने तटस्थ ठिकाणी खेळवले जातील. हा नियम आता फेब्रुवारी आणि मार्च 2025 मध्ये खेळल्या जाणाऱ्या आगामी ICC पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (पाकिस्तानचं यजमानपद) तसंच ICC महिला क्रिकेट विश्वचषक 2025 (भारताद्वारे आयोजित) आणि ICC पुरुषांच्या T20 वर्ल्ड कप 2026 (भारत आणि श्रीलंका यजमान) देखील लागू होईल. 2028 मध्ये आयसीसी महिला T20 विश्वचषकाचे आयोजन करण्याचे अधिकार PCB ला देण्यात आले आहेत, जेथे तटस्थ स्थळ व्यवस्था देखील असेल अशी घोषणा करण्यात आली.
चाहत्यांना वेळापत्रकाची प्रतीक्षा :आयसीसीच्या अधिकृत घोषणेसह, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत दीर्घकाळापासून सुरु असलेला वाद संपुष्टात आला असून आता चाहत्यांना स्पर्धेच्या वेळापत्रकाची प्रतीक्षा आहे. आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीचा सामना कधी आणि कुठं रंगणार हे पाहायचं आहे. मात्र, दुबईत दोन्ही संघ भिडण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
- विराट कोहलीला राग अनावर, विमानतळावरच महिला पत्रकाराशी वाद; पाहा व्हिडिओ
- मालिकेतील निर्णायक सामना सुरु होण्यापूर्वीच यजमान संघाला मोठा धक्का; दिग्गज खेळाडू 'आउट'