चट्टोग्राम (बांगलादेश) Bangladesh Scored 10 Runs in 1 Ball : बांगलादेश क्रिकेट संघ सध्या घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. यातील पहिल्या सामन्यात त्यांना दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. चट्टोग्रामच्या मैदानावर खेळल्या जात असलेल्या या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात संध्या दक्षिण आफ्रिका संघाची स्थिती बऱ्यापैकी मजबूत दिसत आहे. मात्र दुसऱ्या दिवसाच्या खेळात जेव्हा बांगलादेशचा संघ पहिल्या डावात फलंदाजीसाठी उतरला तेव्हा एका चेंडूनंतर त्यांची धावसंख्या 10 धावा होती. मात्र यात दोन्ही फलंदाजांचं खातंही उघडलं नव्हतं. अशा परिस्थितीत हे कसं घडलं याचं अनेक चाहत्यांना नक्कीच आश्चर्य वाटेल.
कशा मिळाल्या एका चेंडूत 10 धावा :दक्षिण आफ्रिकेच्या संघानं चट्टोग्राम कसोटी सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 6 गडी गमावून 575 धावा करुन पहिला डाव घोषित केला. ज्यात त्यांच्या तीन फलंदाजांनी शतकं झळकावली आणि याशिवाय दोन खेळाडूंनी अर्धशतकं झळकावली. यामध्ये एक नाव आहे आफ्रिकन संघाचा खेळाडू सेनुराम मुथुसामीचं ज्यानं नाबाद 68 धावा केल्या. मात्र, त्यानं फलंदाजी करताना मोठी चूक केली ज्यामुळं आफ्रिकन संघाला 5 धावांच्या पेनल्टीला सामोरं जावं लागलं. वास्तविक, जेव्हा मुथुसामी फलंदाजी करत होता, तेव्हा तो धावा काढण्याच्या प्रयत्नात खेळपट्टीच्या मध्यभागी धावला, त्यामुळं पंचांनी 5 धावांचा दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला. बांगलादेश संघाचा पहिला डाव सुरु झाला तेव्हा आफ्रिकेसाठी गोलंदाजीची सलामी देणाऱ्या कागिसो रबाडाने पहिल्या चेंडूवर एकही धाव दिली नाही, मात्र त्यानं दुसरा चेंडू लेग साइडवर टाकला, जो फलंदाजापासून दूर गेला, जो सरळ सीमेवर गेला. त्यावर चार धावा झाल्या आणि तो नो-बॉल असल्यामुळं या चेंडूवर एकूण 5 धावा झाल्या आणि अशा प्रकारे बांगलादेश संघाची धावसंख्या त्यांच्या डावाच्या पहिल्याच चेंडूवर कोणतंही नुकसान न होता 10 धावा झाली.