मुंबई Most Runs in Test Match : सध्या क्रिकेटविश्वात भारतीय गोलंदाजांचं वर्चस्व आहे. जगभरातील फलंदाजांमध्ये भारतीय संघाच्या गोलंदाजांची भीती आहे. पण एक काळ असा होता की भारतीय गोलंदाज फलंदाजासमोर हाताश झालेले दिसत होते. इंग्लंडच्या एका फलंदाजानं एकाच कसोटीत तब्बल 456 धावा केल्या होत्या. कसोटी क्रिकेटमध्ये आपण अनेक खेळी पाहिल्या आहेत, काहींनी द्विशतकं तर काहींनी तिहेरी शतकंही झळकावली आहेत, या क्रिकेटपटूचा 34 वर्षांपासून एक विक्रम आजपर्यंत कोणीही मोडू शकलेला नाही. तो म्हणजे एका कसोटीत सर्वाधिक वयक्तिक धावा.
पहिल्या कसोटीत शुन्यावर बाद : क्रिकेट जगतात असे अनेक दिग्गज झाले आहेत ज्यांची कारकिर्दीची सुरुवात खराब झाली असेल पण नंतर त्यांनी आपल्या कामगिरीनं त्यांनी जागतिक क्रिकेटवर राज्य केलं. असाच एक महान क्रिकेटर म्हणजे इंग्लंडचा ग्रॅहम गूच. गूचनं इंग्लंड क्रिकेट संघाकडून खेळण्यापूर्वी एसेक्ससाठी क्रिकेट खेळलं आहे. 1975 मध्ये, ग्रॅहम गूच इंग्लंडच्या कसोटी संघात सामील झाला आणि 1975 मध्ये बर्मिंगहॅम इथं ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला. पहिल्या कसोटीत गूचचं नशीब चांगलं नव्हतं आणि तो दोन्ही डावात एकही धाव न काढता बाद झाला. या इंग्लिश फलंदाजाला अशा पद्धतीनं बाद केल्यानंतर हाच क्रिकेटपटू इंग्लिश क्रिकेटला कलाटणी देईल, असं कुणालाही वाटलं नसेल. एकीकडे गूच पदार्पणाच्या कसोटीत एकही धाव न काढता बाद झाला, तर दुसरीकडे लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर त्रिशतक झळकावण्यातही तो यशस्वी ठरला. लॉर्ड्सवर कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारा गूच हा जगातील पहिला क्रिकेटपटू आहे.
लॉर्ड्सवर खेळली ऐतिहासिक खेळी : ग्रॅहम गूचनं 1990 मध्ये भारताविरुद्ध लॉर्ड्स कसोटीत 333 धावांची शानदार इनिंग खेळली होती. जी आजही लक्षात आहे. गूचनं खेळलेली ही खेळी कोणत्याही फलंदाजानं लॉर्ड्सवर खेळलेली सर्वात मोठी खेळी आहे. आपल्या संस्मरणीय खेळीत गूचनं 485 चेंडूंचा सामना केला आणि 43 चौकार लगावले. याशिवाय इंग्लंडच्या या दिग्गज खेळाडूनं 3 षटकारही ठोकले होते. याच कसोटीच्या दुसऱ्या डावातही गूचनं शतक झळकावलं आणि 123 धावा करुन तो बाद झाला. म्हणजेच एका कसोटी सामन्यात गूचनं एकूण 456 धावा करुन सर्वांना आश्चर्यचकित केलं. जो आजही एका कसोटीत सर्वाधिक वयक्तिक धावांचा विक्रम असून तो आजही कायम आहे.
ग्रॅहम गूचनं केलं इंग्लंडचं नेतृत्व : ग्रॅहम गूचनं 34 सामन्यांत इंग्लंड संघाचं नेतृत्व केलं आहे. त्याच्या नेतृत्वाखाली गूचनं 10 कसोटी सामन्यांमध्ये इंग्लंडला विजय मिळवून दिला. गूच हा लॉर्ड्सवर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. गूचनं लॉर्ड्सवर 21 कसोटी सामने खेळले असून यात तो 2015 धावा करण्यात यशस्वी ठरला होता. लॉर्ड्सवर गूचच्या नावावर 6 शतकं आणि 5 अर्धशतकं आहेत.