नवी दिल्ली Afghanistan Cricket Team : अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानं (ACB) बुधवारी भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक रामकृष्णन श्रीधर यांची न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी एकदिवसीय कसोटी सामन्यासाठी आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी राष्ट्रीय क्रिकेट संघाचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानं केली घोषणा :अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या घोषणेनुसार, 'अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानं भारतीय रामकृष्णन श्रीधर यांची न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी एकदिवसीय कसोटी सामन्यासाठी आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी राष्ट्रीय संघाचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.' 54 वर्षीय श्रीधर, ज्यांनी ऑगस्ट 2014 ते नोव्हेंबर 2021 पर्यंत 7 वर्षे भारताचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून काम केलं आहे, त्यांनी भारतीय देशांतर्गत सर्किटमध्ये 35 प्रथम श्रेणी आणि 15 लिस्ट ए सामने खेळले आहेत आणि त्यांना खेळाची सखोल माहिती आहे. दोन आयसीसी एकदिवसीय विश्वचषक आणि दोन टी 20 आंतरराष्ट्रीय विश्वचषकांसह 300 हून अधिक आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये श्रीधर भारताच्या कोचिंग स्टाफमधील एक प्रमुख सदस्य होते.