मुंबई First Retention of IPL 2025 :IPL 2025 च्या मेगा लिलावासाठी रिटेंशन पॉलिसी गेल्या महिन्यात जाहीर करण्यात आली होती. या धोरणानुसार, फ्रँचायझी त्यांच्या विद्यमान संघातून एकूण 6 खेळाडूंना कायम ठेवू शकतील. रिटेंशन पॉलिसी येऊन सुमारे 3 आठवडे उलटून गेले असले तरी, अद्यापपर्यंत कोणत्याही संघाकडून रिटेंशन यादीबाबत कोणतंही मोठं अपडेट जारी करण्यात आलेलं नाही.
31 ऑक्टोबरपर्यंत मुदत : वास्तविक, सर्व 10 IPL संघांना 31 ऑक्टोबरपर्यंत त्यांच्या सर्व रिटेन ठेवलेल्या खेळाडूंची यादी BCCI कडे सादर करायची आहे. ज्यात आता फक्त एक आठवडा शिल्लक आहे. अशा परिस्थितीत सर्व फ्रँचायझींनी रिटेंशन लिस्ट तयार करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, 2008 चे विजेते राजस्थान रॉयल्सकडून रिटेनशनबाबत एक मोठं अपडेट आलं आहे. राजस्थान रॉयल्सनं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे ज्यात फ्रँचायझीनं आपला पहिला खेळाडू कायम ठेवल्याचं सूचित केलं आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून राजस्थाननं या धडाकेबाज फलंदाजाला कायम ठेवल्याचं चाहते सांगत आहेत.
राजस्थान रॉयल्सनं दिला मोठा इशारा : राजस्थान रॉयल्सनं इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये राजस्थानचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, क्रिकेटचे संचालक कुमार संगकारा आणि फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठौड दिसत आहेत. या छायाचित्रात लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे कोचिंग स्टाफशिवाय टीमचा कर्णधार संजू सॅमसनही दिसत आहे. हा फोटो समोर आल्यानंतर राजस्थान संघानं संजू सॅमसनला कर्णधारपदी कायम ठेवल्याचे संकेत मिळत आहेत. तथापि, फ्रेंचायझीकडून अद्याप कोणतंही अधिकृत विधान आलेलं नाही.
राजस्थान रॉयल्सनं काय लिहिलं : फोटो शेअर करताना राजस्थान रॉयल्सनं लिहिलं, "बिग वीक!" फोटोच्या कॅप्शनवरुन हे स्पष्ट होतं की येणारा आठवडा सर्व फ्रँचायझींसाठी खूप महत्त्वाचा आहे कारण सर्व संघांना रिटेन ठेवण्यासाठी खेळाडूंची नावं जाहीर करायची आहेत. अशा परिस्थितीत संजू सॅमसनची राजस्थान रॉयल्सच्या (RR) कोचिंग स्टाफसोबतच्या बैठकीतील उपस्थिती मोठे संकेत देत आहे.
हेही वाचा :
- 52/2 ते 53/10... अवघ्या एका धावेत गमावल्या आठ विकेट, 6 खेळाडू झाले शून्यावर आउट; ऑस्ट्रेलियाच्या संघाची खराब कामगिरी
- पाकिस्तानमुळं 1882 नंतर क्रिकेटला पाहायला मिळालं 'हे' दृश्य; क्रिकेटच्या इतिहासात दुसऱ्यादाच 'असं' घडलं