क्राइस्टचर्च Hagley Oval Stadium :क्रिकेटच्या तीन फॉरमॅटमध्ये टेस्ट क्रिकेट हा सर्वात जुना फॉरमॅट आहे. आज जरी चाहते T20 क्रिकेट पाहण्यासाठी सर्वात जास्त उत्सुक असले तरी एक काळ असा होता जेव्हा फक्त कसोटी क्रिकेट खेळलं जायचं आणि स्टेडियम पूर्णपणे भरलं जायचे. पण काळ बदलला आणि कसोटी क्रिकेटची लोकप्रियता हळूहळू कमी होऊ लागली. कसोटी क्रिकेट आज T20 क्रिकेटइतकं लोकप्रिय नसेल, परंतु चाहते अजूनही दोन मोठ्या संघांमध्ये खेळला जाणारा कसोटी सामना पाहण्याची संधी सोडत नाहीत. त्यामुळंच कसोटी क्रिकेट पुन्हा एकदा लोकप्रिय होत आहे.
पहिल्या दिवसापर्यंत 319 धावा : सध्या दोन मोठ्या कसोटी मालिका खेळल्या जात आहेत. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आहेत. त्याच वेळी, इंग्लंड संघ 28 नोव्हेंबरपासून सुरु झालेल्या न्यूझीलंडच्या घरच्या मैदानावर कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळत आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंडनं 8 गडी गमावून 319 धावा केल्या आहेत. या सामन्यात लंच ब्रेक जाहीर होताच या सामन्यात एक मनोरंजक आणि अनोखं दृश्य पाहायला मिळालं.
पहिल्या दिवशी दिसलं अप्रतिम दृश्य :वास्तविक, 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात क्राइस्टचर्च येथील हॅगली ओव्हलवर खेळवला जात आहे. पहिल्या दिवशी लंच ब्रेक असताना सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना मैदानात येण्याची संधी देण्यात आली. ही सुवर्णसंधी मिळताच शेकडो प्रेक्षकांनी काही वेळातच संपूर्ण मैदान व्यापलं. यावेळी अनेक प्रेक्षक सेल्फी घेऊ लागले तर अनेकांनी मैदानात स्वतःचं क्रिकेट खेळायला सुरुवात केली. काही काळ असं वाटलं की, हे मैदान कसोटी सामन्यासाठी नव्हे तर लोकांच्या सहलीसाठी तयार केलं आहे.
इंग्लंड क्रिकेटनं शेअर केला व्हिडिओ : लंच ब्रेक होताच सर्व चाहते मैदान सोडून प्रेक्षक गॅलरीत बसून कसोटी सामन्याचा आनंद घेऊ लागले. या मजेशीर घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डानं (ECB) हा व्हिडिओ सोशल मीडियावर एका मनोरंजक कॅप्शनसह शेअर केला आहे. इंग्लंड क्रिकेटनं लिहिले - लंच ब्रेक दरम्यान चाहत्यांना मैदानात येण्याची परवानगी देण्यासाठी हॅगली ओव्हलकडून एक शानदार प्रयत्न.
हेही वाचा :
- 6,6,6,6,4...पांड्यानं चेन्नईच्या बॉलरला धुतलं, एकाच ओव्हरमध्ये काढल्या 30 धावा; पाहा व्हिडिओ
- 7 चेंडूत 4 विकेट, 32 धावांत संघ ऑलआउट; T20 सामन्यात 102 चेंडू शिल्लक ठेवून विक्रमी विजय