लंडन Ben Stokes : इंग्लंड कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार बेन स्टोक्सला 'द हंड्रेड क्रिकेट लीग'मध्ये खेळताना डाव्या हाताला झालेल्या दुखापतीमुळं उर्वरित क्रिकेटमधून बाहेर काढण्यात आलं आहे. रविवारी नॉर्दर्न सुपरचार्जर्स आणि मँचेस्टर ओरिजिनल्स यांच्यातील सामन्यादरम्यान स्टोक्सला दुखापत झाली होती. दुखापतीनंतरच्या स्कॅनमुळं त्याला पुढील आठवड्यापासून श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडावं लागलं आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) च्या अधिकृत निवेदनात बोर्डानं पुष्टी केली की, इंग्लंडचा कर्णधार ऑक्टोबरमध्ये पाकिस्तान दौऱ्यापासून पुन्हा परत येऊ शकतो.
बेन स्टोक्स श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीतून बाहेर : इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स रविवारी 'द हंड्रेड'मध्ये नॉर्दर्न सुपरचार्जर्सकडून खेळताना त्याच्या डाव्या हाताला दुखापत झाल्यामुळं उर्वरित स्पर्धेसाठी बाहेर पडला आहे. मंगळवारी लीड्समध्ये घेतलेल्या स्कॅनमुळं स्टोक्सला बुधवार, 21 ऑगस्टपासून एमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्ड इथं सुरु होणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध इंग्लंडच्या तीन सामन्यांच्या रोथेसे कसोटी मालिकेतून वगळण्यात येईल. या मालिकेसाठी संघात कोणताही नवा खेळाडू असणार नाही. यानंतर बेन स्टोक्सचं पाकिस्तानला परतण्याचं उद्दिष्ट आहे, असं ईसीबीने अधिकृत निवेदनात म्हटलं आहे. ही मालिका ऑक्टोबरच्या सुरुवातीला सुरू होणार आहे. या दौऱ्यात मुलतान, कराची आणि रावळपिंडी येथील तीन कसोटी सामन्यांचा समावेश आहे. बेनच्या अनुपस्थितीत इंग्लंडचा फलंदाज ओली पोप संघाचं नेतृत्व करेल.