लंडन Graham Thorpe Passed Away : इंग्लंड आणि सरेचे माजी दिग्गज फलंदाज ग्रॅहम थॉर्प यांचं निधन झालं आहे. ते 55 वर्षांचे होते. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानं (ECB) सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली. 1993 ते 2005 या कालावधीत इंग्लंडकडून 100 कसोटी सामने खेळलेले थॉर्प 2022 मध्ये गंभीर आजारी पडले होते. परंतु त्यांच्या वैद्यकीय स्थितीचा तपशील ECB नं शेअर केलेला नाही.
ईसीबीनं दिली माहिती : ईसीबीनं आपल्या निवेदनात म्हटलं की, 'ईसीबी ग्रॅहम थॉर्प यांचं निधन झाल्याची बातमी अत्यंत दुःखानं सांगत आहे. ग्रॅहमच्या निधनानं आम्हाला जो मोठा धक्का बसला आहे तो शब्दात व्यक्त करणं शक्य नाही. त्यांच्या कौशल्यावर प्रश्नच नव्हता. त्यांच्या 13 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्यांची क्षमता आणि यशामुळं त्यांचे सहकारी, इंग्लंड आणि सरे समर्थकांना खूप आनंद होत होता.'
इंग्लंडसाठी खेळले 100 कसोटी सामने : ग्रॅहम थॉर्पनं 100 कसोटी सामन्यांमध्ये 44.66 च्या सरासरीनं 6744 कसोटी धावा केल्या आहेत. ज्यात 16 शतकं आणि 39 अर्धशतकांचा समावेश आहे. थॉर्पनं इंग्लंडकडून 82 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले. यात 37.18 च्या सरासरीनं 2380 धावा केल्या. थॉर्पनं एकदिवसीय सामन्यांत 21 अर्धशतकं झळकावली आहेत. या फलंदाजानं सरेकडून काउंटी क्रिकेट खेळलं आणि संघासाठी सुमारे 20 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. थॉर्पनं आपल्या क्रिकेट कारकिर्दीत एकूण 58 शतकं झळकावली होती.
सचिन-सेहवागसारख्या दिग्गजांसोबत खेळले क्रिकेट : ग्रॅहम थॉर्प सचिन-सेहवागसारख्या दिग्गजांसह क्रिकेटही खेळले. त्यांनी भारतीय संघाविरुद्ध 5 कसोटीत 35 पेक्षा जास्त सरासरीनं 283 धावा केल्या आहेत. भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात या खेळाडूनं 36 पेक्षा जास्त सरासरीनं 328 धावा केल्या. भारताविरुद्ध या खेळाडूची सरासरी निश्चितच चांगली होती पण तो कधीच शतक करु शकला नाही.
हेही वाचा :
- 'हिटमॅन'नं दुसऱ्या वनडेत दोन धावा काढताच रचला इतिहास; 'द वॉल'ला टाकलं मागे - Rohit Sharma
- भारत विरुद्ध श्रीलंका वनडे सामना हॉटस्टार, जिओ सिनेमावर दिसत नाही; कुठे बघता येईल लाइव्ह मॅच? - IND VS SL 2nd ODI