वेलिंग्टन England Wins Series in New Zealand :वेलिंग्टन इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंड क्रिकेट संघानं दणदणीत विजय नोंदवला आहे. त्यांनी यजमान कीवी संघाचा 323 धावांच्या मोठ्या फरकानं पराभव केला. या विजयासह इंग्लंडने मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतलीय.
16 वर्षांनी इंग्लंडचा मालिका विजय : बेन स्टोक्सच्या संघानं दुसऱ्या डावात 427 धावा केल्या होत्या आणि पहिल्या डावात 155 धावांच्या आघाडीच्या जोरावर 583 धावांचं महाकाय लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ 259 धावांवर गडगडला. या विजयासह इंग्लंडनं मालिका 2-0 अशी घातली असून 16 वर्षांनंतर न्यूझीलंडमध्ये कसोटी मालिका जिंकली आहे. मात्र, अजून एक सामना बाकी असला तरी त्यात पराभूत होऊनही ही मालिका इंग्लंडच्या नावावर राहणार आहे.
हॅरी ब्रूक आणि रुट ठरले विजयाचे हिरो : इंग्लंडकडून हॅरी ब्रूक, जो रुट आणि गस ऍटकिन्सन यांनी इंग्लंडच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. पहिल्या डावात अवघ्या 43 धावांत 4 विकेट गमावल्यानंतर ब्रूकनं ऑली पोपसोबत 174 धावांची भागीदारी केली. त्यानं 115 चेंडूत 123 धावांची स्फोटक खेळी करत इंग्लंडला 280 धावांपर्यंत मजल मारली. दुसऱ्या डावातही त्यानं अर्धशतक झळकावलं. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणूनही निवडण्यात आले. दुसऱ्या डावात जो रुटनं 106 धावांची खेळी केली आणि 583 धावांचं मोठं लक्ष्य ठेवण्यात मदत केली.