वेलिंग्टन Most Runs in Test Cricket History : सध्या इंग्लंड क्रिकेट संघ 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली संघानं पहिल्या सामन्यात जबरदस्त विजय मिळवला होता आणि मालिकेत 1-0 नं आघाडी घेतली होती. आता उभय संघांमधील दुसरी कसोटी वेलिंग्टन इथं खेळवली जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडनं कसोटीत 5 लाख धावा करुन नवा विश्वविक्रम केला. अशी कामगिरी करणारा हा जगातील पहिला संघ ठरला आहे. इंग्लंडनं शनिवारी 7 डिसेंबर रोजी दुसऱ्या डावात ही कामगिरी केली.
1082 कसोटी सामन्यांमध्ये जागतिक विक्रम : इंग्लंड संघानं कसोटी क्रिकेटमध्ये 5 लाख धावा करुन इतिहास रचला आहे. त्यांनी 1082 कसोटी सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे. यासह आता इंग्लंडचा संघ कसोटीत सर्वाधिक धावा करणारा संघ बनला आहे. इंग्लंडनंतर कसोटीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहे. त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत 428794 धावा केल्या आहेत. तर भारतीय संघानं कसोटी क्रिकेटमध्ये 278700 धावा केल्या आहेत.
सर्वाधिक शतकांचा विक्रम इंग्लंडच्या नावावर :कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं ठोकण्याचा विक्रमही इंग्लंडच्या नावावर आहे. या संघाच्या फलंदाजांनी आतापर्यंत 929 कसोटी शतकं ठोकली आहेत. या बाबतीतही ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे, ज्यांच्या फलंदाजांनी आतापर्यंत 892 कसोटी शतकं झळकावली आहेत. तर भारतीय फलंदाजांनी आतापर्यंत 552 कसोटी शतकं ठोकली आहेत.
इंग्लंड मालिका जिंकण्याच्या मार्गावर : वेलिंग्टन कसोटीत इंग्लंड संघानं पहिल्या डावात 280 धावा केल्या होत्या. तर न्यूझीलंडचा संघ 125 धावांत गारद झाला आणि 155 धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात इंग्लंडनं 76 षटकांत 5 गडी गमावून 378 धावा केल्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत त्यांची एकूण आघाडी 533 धावांची झाली होती. या डावात इंग्लंडच्या 4 फलंदाजांनी अर्धशतकं झळकावली आहेत. बेन डकेटनं 92, जेकब बेथेलनं 96 आणि हॅरी ब्रूकनं 55 धावा केल्या. तर जो रुटनं 73 धावा केल्या तर बेन स्टोक्स 35 धावा करुन क्रीजवर उपस्थित आहेत.
हेही वाचा :
- जो 'रेकॉर्ड ब्रेकर' रुट... कीवींविरुद्ध 'अर्धशतकांचं शतक' झळकावत रचला इतिहास
- 'पिंक बॉल' कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताची दमदार सुरुवात, गोलंदाज कांगारुंवर वर्चस्व गाजवणार? 'इथं' पाहा लाईव्ह सामना