हॅमिल्टन Playing 11 Announce :इंग्लंड क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे जिथं ते तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहेत. या मालिकेतील पहिले 2 सामने जिंकून इंग्लंड क्रिकेट संघानं या कसोटी मालिकेत आधीच अजेय आघाडी घेतली आहे. उभय संघांमधील मालिकेतील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना 14 डिसेंबरपासून हॅमिल्टन येथील सेडॉन पार्कवर खेळवला जाणार आहे, त्यासाठी इंग्लंडनं सामन्याच्या एक दिवस आधीच आपल्या प्लेईंग 11 ची घोषणा केली आहे, ज्यात त्यांनी मोठा बदलही केला आहे. यामध्ये त्यांनी वेगवान गोलंदाज अष्टपैलू ख्रिस वोक्सला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे.
मॅथ्यू पॉट्सला इंग्लंडच्या प्लेइंग 11 मध्ये स्थान :हॅमिल्टन कसोटी सामन्यासाठी इंग्लंडच्या प्लेइंग 11 मध्ये एक बदल करण्यात आला आहे. तो म्हणजे ख्रिस वोक्सच्या जागी मॅथ्यू पॉट्सचा संघात समावेश करण्यात आला आहे. 26 वर्षीय पॉट्सनं आतापर्यंत इंग्लंड संघासाठी 9 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात त्यानं 29.22 च्या सरासरीनं 31 विकेट्स घेतल्या आहेत आणि यादरम्यान त्यानं चार वेळा एका डावात 4 बळी घेण्याचा पराक्रमही केला आहे. पॉट्सनं शेवटचा कसोटी सामना इंग्लंडच्या पाकिस्तान दौऱ्यात मुलतानच्या मैदानावर खेळला होता. ख्रिस वोक्सला तिसऱ्या कसोटी सामन्यातून वगळण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे त्याचा खराब फॉर्म, ज्यामुळं तो पहिल्या दोन सामन्यांमध्ये चेंडूवर कोणतीही जादू दाखवू शकला नाही.
क्लीन स्वीपवर इंग्लंडची नजर :या कसोटी मालिकेतील पहिले 2 सामने जिंकल्यानंतर आता या मालिकेतील क्लीन स्वीपकडं इंग्लंडचं लक्ष लागलं आहे. जर इंग्लंड हे करण्यात यशस्वी ठरला तर 1963 नंतर पहिल्यांदाच इंग्लंड संघ न्यूझीलंडला त्याच्या घरच्या मैदानावर कसोटी मालिकेतील सर्व सामन्यांमध्ये पराभूत करण्यात यशस्वी ठरेल. त्याचबरोबर हा कसोटी सामना न्यूझीलंड संघाचा सर्वोत्तम वेगवान गोलंदाज टिम साऊदीच्या कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामनाही असेल, त्यानं ही मालिका सुरु होण्यापूर्वीच कसोटीतून निवृत्ती जाहीर केली होती.