रावळपिंडी (पाकिस्तान) Playing 11 Announced : पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडनं आपल्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. संघात दोन मोठे बदल करण्यात आले आहेत. गस ऍटकिन्सन आणि रेहान अहमद संघात परतले आहेत, तर मॅथ्यू पॉट्स आणि ब्रेडन कार्स यांना बाहेर ठेवण्यात आलं आहे. दुसऱ्या कसोटीत इंग्लंडला पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला. दुसऱ्या डावात पाकिस्तानच्या फिरकीपटूंसमोर इंग्लिश संघाची फलंदाजी पत्त्याच्या गठ्ठासारखी कोसळली होती. संध्या ही मालिका 1-1 नं बरोबरीत असून आता मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना गुरुवार 24 ऑक्टोबरपासून रावळपिंडीत खेळवला जाणार आहे.
इंग्लंडनं केली प्लेइंग इलेव्हनची घोषणा : इंग्लंडनं पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यासाठी आपली प्लेइंग 11 जाहीर केली आहे. इंग्लंड संघानं दोन मोठे बदल केले आहेत. तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी गस ऍटकिन्सन संघात परतला आहे. त्याच वेळी, फेब्रुवारी 2024 मध्ये भारताविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळलेल्या रेहान अहमदलाही प्लेइंग 11 मध्ये स्थान देण्यात आले आहे. रेहाननं आतापर्यंत इंग्लंडसाठी फक्त 4 कसोटी सामने खेळले असून 18 विकेट्स त्याच्या नावावर आहेत. मुलतानच्या मैदानावर फिरकीपटूंना झालेली मदत लक्षात घेऊन इंग्लिश संघानं हे पाऊल उचललं आहे.
पॉट्स आणि ब्रेडेन कार्स संघाबाहेर :इंग्लंडनं तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी मॅथ्यू पॉट्स आणि ब्रेडेन कार्स यांना संघातून वगळलं आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात पॉट्सची कामगिरी काही खास नव्हती. पहिल्या डावात त्यानं 2 विकेट्स घेतल्या होत्या, तर दुसऱ्या डावात त्यानं फक्त एक विकेट घेतली होती. दुसरीकडे, मुलतानमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात ब्रेडन कार्सनं एकूण 5 विकेट घेतल्या.