नागपूर Playing 11 for 1st ODI :भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघात पाच सामन्यांच्या T20 मालिकेनंतर आता 3 सामन्यांची वनडे मालिका सुरु होणार आहे. यातील पहिला सामना 6 फेब्रुवारी (गुरुवार) रोजी नागपूर येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जाईल. पाच सामन्यांची T20 मालिका 4-1 नं जिंकल्यानंतर, टीम इंडिया आता इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळण्यासाठी सज्ज आहे. या सामन्यासाठी आता इंग्लंड संघानं 20 तासांआधीच आपल्या प्लेइंग 11 ची घोषणा केली आहे.
2023 नंतर दिग्गज खेळाडूचं संघात पुनरागमन : खरंतर, इंग्लंड क्रिकेट संघानं भारताविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यासाठी त्यांच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. स्टार फलंदाज जो रुट 15 महिन्यांनंतर इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये परतला आहे. रुटनं 2023 मध्ये शेवटचा वनडे सामना खेळला. त्यानं इंग्लंडसाठी शेवटचा वनडे सामना 11 नोव्हेंबर 2023 रोजी खेळला होता. हा सामना भारतीय भूमीवर खेळला गेलेला वनडे विश्वचषकाचा सामना होता.
कसा आहे संघ : T20 मालिकेप्रमाणे, जॉस बटलर वनडे मालिकेत कर्णधारपद भूषवताना दिसेल आणि विकेटकीपिंग करणार नाही. बटलरच्या जागी फिलिप साल्ट यष्टीरक्षकपदाची जबाबदारी सांभाळतील. फिरकीची जबाबदारी आदिल रशीदवर असेल. लियाम एका अष्टपैलू खेळाडूची भूमिका साकारणार आहे. वेगवान गोलंदाजीची धुरा जोफ्रा आर्चरकडे असेल. आर्चरला वेगवान गोलंदाजी विभागात ब्रायडन कार्स आणि साकिब महमूद यांची साथ मिळेल.
हेड-टू-हेड रेकॉर्ड कसा : भारत आणि इंग्लंड यांच्यात वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकूण 107 सामने खेळले गेले आहेत. यापैकी भारतानं 58 सामने जिंकले आहेत, तर इंग्लंडनं 44 वेळा विजय मिळवला आहे. 3 सामने निकालाविना संपले, तर 2 सामने बरोबरीत सुटले. दोन्ही संघांमधील हा सामना नेहमीच रोमांचक राहिली आहे, ज्यात भारतानं आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. भारतानं नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर 6 वनडे सामने खेळले आहेत, त्यापैकी चार जिंकले आहेत आणि दोन गमावले आहेत. भारतानं या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध उल्लेखनीय विजय मिळवले आहेत आणि दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेविरुद्धही पराभव पत्करावा लागला आहे.