हॅमिल्टन NZ vs ENG 3rd Test :एकीकडे भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ यांच्यातील तिसरा कसोटी सामना ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेनच्या मैदानावर खेळला जात आहे, तर दुसरीकडे न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात हॅमिल्टन येथील सेडॉन पार्कमध्ये मालिकेतील तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. ज्यात इंग्लंडचा संघ प्रथम गोलंदाजी करत आहे आणि त्यांच्या वतीनं वेगवान गोलंदाज गस ऍटिंकसननं एक मोठा पराक्रम केला. त्यानं आपल्या पदार्पणाच्या कॅलेंडर वर्षात इतकी चमकदार कामगिरी केली आहे की कसोटी क्रिकेटमध्ये याआधी फक्त एक गोलंदाज करु शकला आहे. ॲटिंकसनने आपला पहिला कसोटी सामना जुलै महिन्यात खेळला होता.
पदार्पणाच्या वर्षात कसोटीत 50 बळी घेणारा दुसरा गोलंदाज : कोणत्याही गोलंदाजासाठी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणं आणि नंतर संघातील आपलं स्थान पूर्णपणे पक्के करणं हे अजिबात सोपं काम नाही, परंतु गस ॲटिंकसननं हे साध्य केलं आहे आणि आपल्या कामगिरीनं सर्वांना प्रभावित केलं आहे. ॲटिंकसननं केवळ त्याच्या पदार्पणाच्या वर्षातच इंग्लंडच्या कसोटी संघातील आपले स्थानच निश्चित केलं नाही, तर त्यानं त्याच्या पदार्पणाच्या कॅलेंडर वर्षात एक पराक्रम देखील केला जो यापूर्वी केवळ एका गोलंदाजाला करता आला होता.
एका वर्षात घेतले 50 बळी : एटिंकसनला जुलै 2024 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली, तेव्हापासून त्यानं 11 कसोटी सामने खेळले आहेत आणि 50 हून अधिक बळी त्याच्या नावावर केले आहेत. ॲटिंकसनच्या आधी, कसोटी पदार्पणाच्या कॅलेंडर वर्षात, फक्त ऑस्ट्रेलियाच्या टेरी अल्डरमन या वेगवान गोलंदाजानं 1981 मध्ये पदार्पण केलं आणि त्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 54 बळी घेतले.