महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

ऑस्ट्रेलियाचे 'तारे जमीन पर'...! 304 धावा करुनही वनडेत 348 दिवसांनी पराभव - ENG vs AUS 3rd ODI

England vs Australia 3rd ODI : इंग्लंडनं ऑस्ट्रेलियाच्या सलग 14 विजयी मालिकेला ब्रेक लावला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या वनडे मालिकेतील तिसरा सामना त्यांनी जिंकला आहे. इंग्लंडच्या या विजयात हॅरी ब्रूकनं झळकावलेल्या शतकाचा मोठा वाटा आहे.

harry brook
Harry Brook (AP Photo)

By ETV Bharat Sports Team

Published : Sep 25, 2024, 1:04 PM IST

चेस्टर-ली-स्ट्रीट England vs Australia 3rd ODI : अखेर एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा पराभव झाला. पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात त्याला इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला. कर्णधार हॅरी ब्रूकनं शानदार शतक झळकावून आपल्या संघाला मालिकेतील पहिला विजय मिळवून दिला. ब्रूकचं हे वनडेतील पहिलं शतक होतं. या पराभवासह ऑस्ट्रेलियाची विजयी मालिका खंडित झाली. कांगारु संघ सलग 14 सामन्यांत हरला नव्हता. त्यांना एकदिवसीय सामन्यांमध्ये 348 दिवसांनी पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.

ऑस्ट्रेलियानं केल्या 304 धावा : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 वनडे मालिकेतील तिसरा सामना मंगळवारी झाला. ऑस्ट्रेलियानं याआधी झालेल्या दोन्ही एकदिवसीय सामने जिंकून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली होती. तिसऱ्या वनडेतही त्यांनी इंग्लंडसमोर मोठं लक्ष्य ठेवलं होतं. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 7 गडी गमावून 304 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून ॲलेक्स कॅरीनं पुन्हा एकदा सर्वाधिक धावा केल्या. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या कॅरीनं 65 चेंडूत नाबाद 77 धावा केल्या. त्याच्याशिवाय स्टीव्ह स्मिथनं टॉप ऑर्डरमध्ये 60 धावांची खेळी खेळली. ग्लेन मॅक्सवेलनं 30 धावा केल्या. तर ॲरॉन हार्डी आठव्या क्रमांकावर आला आणि त्यानं 44 धावांची खेळी खेळली.

विल जॅक आणि ब्रूक यांच्यात शतकी भागीदारी : इंग्लंडसमोर 305 धावांचं लक्ष्य होतं, ज्याचा पाठलाग करताना त्यांची सुरुवात चांगली झाली नाही. इंग्लंडनं केवळ 11 धावा करुन 2 विकेट गमावल्या. पण त्यानंतर विल जॅक आणि हॅरी ब्रूक यांनी डावाची सुत्रे हाती घेतली. या दोघांनी मिळून शतकी भागीदारी करत संघाची धावसंख्या 27.3 षटकांत 3 गडी गमावून 167 धावांपर्यंत नेली. विल जॅकनं 82 चेंडूत 84 धावा केल्या.

हॅरी ब्रूकचं वनडे कारकिर्दीतील पहिलं शतक : विल जॅक त्याच्या वयक्तिक शतकाच्या जवळ असताना आऊट झाला. मात्र तरी हॅरी ब्रूकनं ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर आपलं वर्चस्व कायम राखलं. त्याला जेमी स्मिथकडून फारशी साथ मिळाली नाही. पण, लियाम लिव्हिंगस्टन आला आणि त्याच्यासोबत सेट झाला. दरम्यान, हॅरी ब्रूकनं वनडे कारकिर्दीतील पहिलंच शतक झळकावलं. हॅरी ब्रूकच्या शतकानंतर सामन्यात पावसानं व्यत्यय आणला, त्यानंतर तो पुन्हा सुरु होऊ शकला नाही. पावसामुळं सामना थांबवण्यात आला तेव्हा हॅरी ब्रूक 94 चेंडूत 110 धावांवर नाबाद होता, तर लिव्हिंगस्टन 30 धावांवर खेळत होता.

ऑस्ट्रेलियाची सलग 14 विजयी मालिका खंडीत : सामन्यात पाऊस येईपर्यंत इंग्लंडनं 37.4 षटकांत 4 गडी गमावून 254 धावा केल्या होत्या. म्हणजेच डकवर्थ लुईस नियमानुसार ते ऑस्ट्रेलियापेक्षा 46 धावांनी आघाडीवर होते. अशा परिस्थितीत पाऊस थांबत नसल्यानं इंग्लंडला विजेता घोषित करण्यात आलं. या निकालामुळं 348 दिवसांत सलग 14 एकदिवसीय सामने जिंकण्याची ऑस्ट्रेलियाची मालिकाही संपुष्टात आली. तिसरा एकदिवसीय सामना जिंकून मालिका खिशात घालू पाहणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा या सामन्यात पराभव झाल्यानं सध्या 5 सामन्यांची वनडे मालिका आता 1-2 अशी झाली आहे. म्हणजेच पुढील दोन सामने रोमांचक होण्याची अपेक्षा आहे.

हॅरी ब्रूकनं रचला इतिहास : 94 चेंडूत 13 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं 110 धावा केल्यानंतर नाबाद राहिलेल्या इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूक याला सामनावीर घोषित करण्यात आलं. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात हॅरी ब्रूकने शतक झळकावलं तेव्हा तो 25 वर्षे 215 दिवसांचा होता. या वयासह, तो एकदिवसीय सामन्यात शतक झळकावणारा इंग्लंडचा सर्वात तरुण कर्णधार बनला.

हेही वाचा :

  1. सरकारनं सुनील गावस्कर यांच्याकडील भूखंड काढून अजिंक्य रहाणेला दिला, काय आहेत कारणं? - Ajinkya Rahane
  2. 'इन दी एअर अँड श्रीशांत टेक्स इट...' 17 वर्षांपूर्वी धोनीच्या नेतृत्त्वाखाली युवा भारतीय संघानं आजच्या दिवशी रचला होता इतिहास - T20 World Cup 2007

ABOUT THE AUTHOR

...view details