महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

18 मिनिटं, 3 षटकं, 100 धावा... क्रिकेटच्या 'डॉन'चा भयानक कारनामा

क्रिकेट विश्वात दररोज काही ना काही विक्रम होत असतात. पण ऑस्ट्रेलियाच्या एका फलंदाजानं अवघ्या तीन षटकात शतक पूर्ण केलं होतं.

By ETV Bharat Sports Team

Published : 5 hours ago

Century in 3 Overs
प्रतिकात्मक फोटो (File Photo)

मुंबई Century in 3 Overs : क्रिकेट विश्वात दररोज काही ना काही विक्रम होत असतात. चाहत्यांनी मैदानावर अनेक दिग्गजांना खेळताना पाहिलं आहे. परंतु, ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन त्यांच्या नावाप्रमाणे खरोखर डॉन होते. जागतिक क्रिकेटमध्ये त्यांनी केलेल्या विक्रमाला आजपर्यंत कोणीही हात लावू शकलं नाही आणि भविष्यातही त्यांच्यासारखा क्वचितच कोणी असेल. प्रत्येकजण ब्रॅडमनच्या सरासरीबद्दल बोलतो पण फार कमी लोकांनी त्याच्या झंझावाती शतकाचा उल्लेख केला आहे.

डॉन ब्रॅडमन (Getty Images)

93 वर्षांपूर्वी केली होती T20 फलंदाजी : 1931 मध्ये जेव्हा T20 क्रिकेटची कल्पनाही केली जात नव्हती, तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या डॉन ब्रॅडमननं 22 चेंडूत शतक झळकावलं होतं. ब्लॅकहीथ इलेव्हन आणि लिथगो इलेव्हन यांच्यात झालेल्या सामन्यात ब्रॅडमननं अशी झंझावाती खेळी खेळली ज्यांनी गोलंदाजांना उद्ध्वस्त केलं. या सामन्यात त्यांच्या संघानं एकूण 357 धावा केल्या, मात्र त्यापैकी एकट्या ब्रॅडमननं 256 धावा केल्या. ब्लॅकहीथसमोर लिथगो इलेव्हन संघ केवळ 228 धावा करु शकला आणि 129 धावांच्या मोठ्या फरकानं सामना गमावला.

ब्रॅडमनचा झंझावात : डॉन ब्रॅडमननं या सामन्यात अवघ्या 3 षटकांत आपलं शतक पूर्ण केलं होतं. आता हे विचार करायला थोडं विचित्र वाटू शकतं, त्यामागचे कारण म्हणजे ओव्हरमध्ये टाकलेल्या चेंडूंची संख्या. त्यावेळी एका षटकात 8 चेंडू टाकण्यात येत होती. डॉन ब्रॅडमननं पहिल्या षटकांत 33 धावा, दुसऱ्या षटकात 40 आणि तिसऱ्या षटकात 27 धावा घेत शतक पूर्ण केलं होतं. या सामन्यात त्यांनी एकूण 256 धावांची खेळी केली. आपल्या विध्वंसक खेळीत ब्रॅडमननं एकूण 14 षटकार आणि 29 चौकार मारले होते.

डॉन ब्रॅडमन (Getty Images)

काय म्हणाले होते डॉन : या सामन्यानंतर ब्रॅडमन म्हणाले होते, मी पहिल्या षटकात 33 धावा केल्या, यात 3 षटकार, 3 चौकार आणि एकदा 2 धावा केल्या तर शेवटच्या चेंडूवर मी 1 धाव घेतली आणि स्ट्राइक ठेवली. दुसऱ्या षटकात मी एकूण 40 धावा केल्या. यात चार षटकार आणि चार चौकार मारले होते. त्यामुळं वेंडेलला स्ट्राइकवर येण्याची संधी मिळाली, त्यानं पुढच्या ओव्हरमध्ये 1 रन देऊन स्ट्राइक दिली. स्ट्राइक मिळाल्यानंतर मी 2 षटकार मारले आणि 1 धाव घेतली. त्यानं 5व्या चेंडूवर मला पुन्हा स्ट्राइक दिली आणि दोन चौकार आणि 1 षटकार मारुन शतक पूर्ण केलं.

3 षटकांत शतक (8 चेंडूचं षटक)

  • पहिलं षटक : (गोलंदाज : विल ब्लॅक) 6, 6, 4, 2, 4, 4, 6, 1 : एकूण 33 धावा
  • दुसरं षटक: (गोलंदाज - हौरी बेकर) 6, 4, 4, 6, 6, 4, 6, 4 : एकूण 40 धावा
  • तिसरं षटक : (बॉलर-विल ब्लॅक) 6, 6, 1, 4, 4, 6 : एकूण 27 धावा

डॉन ब्रॅडमन यांची कारकीर्द कशी : ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज डॉन ब्रॅडमन यांनी 1928 ते 1948 दरम्यान एकूण 52 कसोटी सामने खेळले. यात त्यांनी एकूण 80 डाव खेळले आणि 99.9 च्या सरासरीनं एकूण 6996 धावा केल्या. यामध्ये त्यांनी 29 शतकं आणि 13 अर्धशतकंही केली आहेत. या काळात ब्रॅडमनच्या बॅटमधून 681 चौकार आणि 6 षटकार दिसले. ब्रॅडमननं आपल्या कारकिर्दीत 12 द्विशतकं आणि 2 तिहेरी शतकं झळकावली. तसंच ते 10 वेळा नाबाद राहिले होते. याशिवाय गोलंदाजी करताना 3 बळीही घेतले.

हेही वाचा :

  1. बाबर आझमचे वाईट दिवस सुरु, पाकिस्तान क्रिकेटच्या नव्या निवड समितीनं घेतला मोठा निर्णय
  2. जामनगर राजघराण्याचा उत्तराधिकारी बनला दिग्गज क्रिकेटपटू; रणजी-दुलीप ट्रॉफी याच राजघराण्याची देण

ABOUT THE AUTHOR

...view details