मुंबई BCCI Secretary :भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं आपल्या सचिवाची निवड केली आहे. या पदासाठी देवजीत सैकिया यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. रविवारी, 12 जानेवारी रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेनंतर (एसजीएम) बीसीसीआयनं त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली.
सचिवपदी बिनविरोध निवड : मंडळाच्या घटनेनुसार, हे रिक्त पद भरण्यासाठी 45 दिवसांचा कालावधी होता, ज्यासाठी निवडणुका घेण्यात आल्या. सैकिया यांनी सचिव पदासाठी अर्ज दाखल केला. तथापि, त्यांच्या विरोधात दुसरा कोणताही उमेदवार पुढं आला नाही, त्यानंतर आता त्यांची सचिवपदी औपचारिकपणे बिनविरोध निवड झाली आहे. हे बीसीसीआयमधील सर्वात शक्तिशाली पद मानलं जातं, जे आता सैकिया यांच्याकडे असेल. डिसेंबर 2024 मध्ये जय शाह आयसीसीचे अध्यक्ष बनले. तेव्हापासून सैकिया यांना अंतरिम सचिव बनवण्यात आलं. त्यामुळं त्यांचे नाव या पदासाठी निश्चित मानलं गेलं.
देवजीत होते क्रिकेटपटू :देवजीत भारताकडून क्रिकेट खेळले नाही, पण ते प्रथम श्रेणी क्रिकेटपटू राहिले आहेत. ते आसामसाठी रणजी करंडक क्रिकेट खेळले, ज्यात त्यांनी यष्टिरक्षक-फलंदाजाची भूमिका बजावली. ते मधल्या फळीत फलंदाजीसाठी ओळखले जात होते. मूळचे आसामचे असलेले देवजीत सध्या बीसीसीआयमध्ये सहसचिव आहे. देवजीत क्रिकेट प्रशासक असण्यासोबतच पेशानं वकीलही आहे. बीसीसीआयमध्ये येण्यापूर्वी ते आसाम क्रिकेट असोसिएशनमध्ये सचिव म्हणूनही कार्यरत होते.
आयसीसीच्या अध्यक्षपदी जय शाह यांची बिनविरोध निवड :बीसीसीआयमध्ये सचिवपद भूषवताना जय शाह यांनी क्रिकेटच्या हिताचे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले होते. आता ते आयसीसीमध्ये प्रमुख भूमिकेत दिसत आहे. या वर्षी त्यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. त्यांची आयसीसीचे 16 वे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शहा यांनी काही दिवसांपूर्वीच पदभार स्वीकारला. ICC चे अध्यक्षपद भूषवणारे जय शाह हे सर्वात तरुण व्यक्ती आहेत. त्यांनी न्यूझीलंडच्या ग्रेग बार्कलेची जागा घेतली आहे.
हेही वाचा :
- पाण्यात कमावले आगीत गमावले... दिग्गज जलतरणपटूची 10 ऑलिम्पिक पदकं जळून खाक
- अॅशेसमध्ये कांगारुंचं 'डॉमिनन्स' कायम, पहिल्याच सामन्यात विश्वविजेत्या पाहुण्यांचा पराभव