नवी दिल्ली Delhi Premier League 2024 : दिल्ली प्रीमियर लीग 2024 चा 23 वा सामना दक्षिण दिल्ली सुपरस्टार्स आणि उत्तर दिल्ली संघांमध्ये झाला. या सामन्यात दक्षिण दिल्ली सुपरस्टार्सकडून अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळाली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना संघानं 20 षटकांत 5 बाद 308 धावांचा डोंगर उभारला. जो टी-20 क्रिकेटमध्ये क्वचितच पाहायला मिळतो. या सामन्यात चाहत्यांना मैदानात चौफेर षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली. यादरम्यान 23 वर्षीय सलामीवीर प्रियांश आर्यनं एक मोठी कामगिरी केली. प्रियांश आर्यनं एकाच षटकात 6 षटकार मारुन सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
युवराजसारखा पराक्रम : या लीगमध्ये प्रियांश आर्य चांगली कामगिरी करत आहे. या लीगमध्ये त्यानं आतापर्यंत 2 शतकं झळकावली आहेत. त्याच वेळी, उत्तर दिल्लीविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्यानं मनन भारद्वाजविरुद्ध एका षटकात सहा षटकार मारण्याचा पराक्रम केला. सामन्याच्या 12व्या षटकात प्रियांशनं प्रत्येक चेंडू सीमारेषेपलीकडे टोलावला. यासह, तो एका षटकात 6 षटकार मारणारा दिल्ली प्रीमियर लीगचा सर्वोत्तम फलंदाज बनला आहे. याआधी दिल्ली प्रीमियर लीगमध्ये शतक झळकावणारा तो पहिला फलंदाजही ठरला होता.
प्रियांश आर्यनं पुन्हा झळकावलं शतक : या सामन्यात प्रियांश आर्यनं 50 चेंडूंचा सामना करत 120 धावांची शानदार खेळी खेळली. या खेळीत प्रियांश आर्यनं 10 चौकार आणि 10 षटकार मारले. प्रियांश आर्यनं 240 च्या स्ट्राईक रेटनं या धावा केल्या. आयुष बडोनीसह त्यानं दुसऱ्या विकेटसाठी विक्रमी 286 धावांची भागीदारी केली, जी या लीगमधील आतापर्यंतची सर्वात मोठी भागीदारी आहे. प्रियांशची ही पहिलीच इनिंग नाही, तर त्यानं एकामागून एक अशा अनेक मोठ्या इनिंग्स खेळल्या आहेत.